भाईंदर : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने मराठी एकीकरण समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मराठी नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारात मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभागाकडून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत चालकांना व्यवहारासाठी आवश्यक असलेली मराठी शिकविण्यात आली होती. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाकडून मराठी संवादाची तपासणी सुरू करण्यात आली होती. ठाण्यानंतर मिरा रोडमध्येही रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. मात्र, आता रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या कालावधीत चालकांवर कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मराठी एकीकरण समितीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला असून, दोन दिवसांनी मराठी नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले आहे. केवळ मताच्या राजकारणासाठी फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून याचा उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीला फटका बसू नये हे करण्यात आले असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.