वसई:- मुंबई कुलाबा सत्र न्यायालयात पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या सराईत आरोपीला विरारच्या बोळींज पोलिसांनी अटक केली आहे. ॲन्थोनी जोसेफ (४७) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गंभीर गुन्ह्यात तो आर्थर रोड कारागृहात होता.

मिळालेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी आर्थर रोड कारागृहातून आरोपी ॲन्थोनी जोसेफ (४७) याला सुनावणीसाठी कुलाबा सत्र न्यायालयात नेण्यात आले होते. मात्र दुपारी ३ च्या सुमारास, न्यायालयाच्या आवारात पोलिसांची नजर चुकवून आणि हाताला झटका देऊन जोसेफ हा पळून गेला होता. त्याचा शोध कुलाबा पोलिसांकडून सुरू होता.

पळून आलेला जोसेफ विरार पश्चिम येथील बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत होता. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ए कार्यालयासमोर एका स्टॉलवर चहा पिण्यासाठी गेला होता. मात्र चहा प्यायल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्याठिकाणी वाद सुरू झाला.

याच दरम्यान गस्तीवर असलेले बीट मार्शल दिनेश सानप आणि सुरक्षा रक्षक अक्षय देसाई यांनी गर्दी पाहून त्यांनी विचारपूस केले असता जोसेफ उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे आणि पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली.

सुरुवातीला नाव-पत्ता लपवणाऱ्या जोसेफने अखेर आपण कुलाबा न्यायालयातून पळाल्याची कबुली दिली असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले आहे. यावेळी सराईत आरोपीला पकडणाऱ्या बिट मार्शल व सुरक्षा रक्षक यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

आरोपीवर २० गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून घरफोडी, चोरी यासह पोक्सो अंतर्गत गुन्हे कुलाबा, वडाळा, शिवडी, एलटी मार्ग, एम आर ए मार्ग अशा ठिकाणी २००७ पासून ते आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय २००७, २०१२, २०१९ आणि २०२२ या दरम्यान या आरोपीला चार वेळा तडीपार ही करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.