मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ई-ऑफिस प्रणाली; राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय

सुहास बिऱ्हाडे

वसई : कायदा व सुव्यवस्थेविषयी नागरिकांनी केलेल्या कोणत्याही तक्रारीची १५ मिनिटांत दखल घेण्याची सुविधा देणारी ई-ऑफिस प्रणाली मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली लागू करणारे हे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यास मदत होत आहे.

सर्वसामान्य नागरिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विविध प्रकारचे अर्ज आणि तक्रारी करत असतात. मात्र वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या अर्जांला विलंब लागत असतो. त्यामुळे अनेकदा तक्रारदाराला न्याय मिळत नाही. यासाठी मीरा भाइंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने ई ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे कागदाची बचत तर होतेच शिवाय कारभारदेखील पारदर्शक आणि गतिमान होऊ लागला आहे. वरिष्ठांकडे अर्ज नेणे, त्याची पोचपावती घेणे, वरिष्ठांनी तो अर्ज संबंधित विभागाकडे पाठवणे यासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ, कागदे आदी या ई-ऑफिस प्रणालीमुळे वाचू लागला आहे.

पोलीस  आयुक्तालयातील १२२ पोलीस अधिकारी आणि विभागप्रमुख या ई-ऑफिस प्रणालीशी जोडले आहेत. आलेले अर्ज स्कॅन करून थेट प्रणालीवर येत असल्याने अधिकाऱ्यांचे टेबल फायलीमुक्त झाली आहेत. ‘ई-ऑफिस’ प्रणालीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने अर्ज निकाली काढण्यात किती वेळ लावला, याचीही नोंद होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कामाचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे. त्याखालोखाल पोलीस उपायुक्त विजयकांत सागर (९४ टक्के), अतिरिक्त आयुक्त जयकुमार (८४ टक्के) इतके आहे. दाते यांच्याकडे आलेले अर्ज निकाली निघण्यात सरासरी दहा मिनिटे खर्च होतात तर, सागर यांच्याकडून सरासरी नऊ मिनिटांत अर्ज निकाली निघत असल्याचे आढळून आले. संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अर्ज निकाली काढण्याचे प्रमाण सरासरी १५ मिनिटे इतके आहे.

अंतर्गत कामकाजासाठीही उपयोग

पोलिसांनाही रजेचे किंवा इतर दैनंदिन कामांचे अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावे लागायचे.  मात्र ई-ऑफिसमुळे हे काम एका क्लिकवर झाले आहे. पोलिसांनी आपला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे ई-ऑफिस प्रमाणीवर अपलोड केल्यास तात्काळ तो वरिष्ठांपर्यत पोहोचतो.

काय आहे ‘ई-ऑफिस’ प्रणाली

राष्ट्रीय इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीने (एनआयसी) ई-ऑफिस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेले प्रत्येक अर्ज संगणकाद्वारे स्कॅन करून तातडीने वरिष्ठांच्या खात्यात पाठवले जातात. त्या अर्जाची वरिष्ठ अधिकारी तात्काळ दखल घेऊन कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवतात. या सर्व अर्जांचा कायमस्वरूपी नोंद संगणकात रहाते. कुणाकडे किती अर्ज आले? किती अर्ज प्रलंबित आहेत? किती वेळेत त्यावर कारवाई केली? याची सर्व माहिती ई-ऑफिस प्रणालीवर सर्वांना एकाच वेळी दिसते.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ई-ऑफिस प्रणालीचा उपयोग होत आहे. यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लागणारा वेळ वाचत असून कारभार गतिमान आणि पारदर्शक होत आहे.

सदानंद दाते-पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार

ई—ऑफिस प्रणालीमुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची तपशीलवार नोंद ठेवली जात असून त्यांच्या तक्रारी निकाली काढेपर्यंत माग ठेवला जातो. अधिकाऱ्यांची कार्यकुशलता देखील यामुळे तपासली जाते.

— विजयकांत सागर- पोलीस उपायुक्त (मुख्यालय)