विरार : जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र वसईत अनेक खासगी शाळा पालकांना काही ठरावीक विक्रेत्यांकडूनच हे साहित्य घेण्याचे पत्र पाठवतात. बाजारभावापेक्षा अधिक दराने हे साहित्य मिळत असल्याने पालक शाळांच्या या मनमानी कारभारावर नाराज आहेत. खासगी शाळांवर शासनाचे निर्बंध नसल्याने पालकांना पदरमोड करून ही खरेदी करावीच लागते.
करोनाकाळात बंद असलेल्या शाळा दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू होत असल्याने मुले उत्साहात आणि पालक शालेय साहित्याच्या खरेदीत व्यग्र आहेत. मात्र अनेक खासगी शाळांनी पाठय़पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य शाळेने सांगितलेल्या ठरावीक दुकानांतूनच खरेदी करावे, अशी सक्ती केली आहे. दुसरीकडे हेच साहित्य वाजवी दरात मिळत असताना शाळेचा विशिष्ट दुकानांसाठी आग्रह का? असा सवाल पालक करत आहेत. करोनाकाळात ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनेक पालकांना हा अधिकचा खर्च सोसणे कठीण होत आहे.
शाळांनी ठरवून दिलेले विक्रेते बाजारभावापेक्षा जास्त दर आकारतात, शाळाही अधिकाधिक नफा मिळण्यासाठी तेथूनच खरेदी करण्याच्या सक्तीचे आदेश काढतात. त्यामुळे पालकांचा नाईलाज होतो. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा यात अग्रेसर आहेत.
करोनाकाळात अनेक शाळांनी स्वत:चा वेगळा अभ्यासक्रम सुरू केल्याने एखाद्या विशिष्ट प्रकाशनाचीच पाठय़पुस्तके आणि साहित्याची गरज निर्माण केली आहे. शाळा, विक्रेते आणि प्रकाशने यांचे साटेलोटे असल्याचा आरोप पालक करत आहेत. शिवाय शाळांनी नेमलेले दुकानदार पाठय़पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचा एक संपूर्ण संचच देतात त्यातील अनेक पुस्तकांची गरजही नाही. त्यावर वस्तू सेवा कराचे देयकही दिले जात नाही.
सर्व शिक्षा अभियानातील मुले अडचणीत
शासन निर्णय २००४ नुसार कोणत्याही शाळेला एखाद्या विशिष्ट, ठरावीक विक्रेत्याकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करा अशी सक्ती पालकांवर करता येत नाही. परंतु शाळा व्यवस्थापनाने हे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. सर्व खासगी शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अनेक गरीब मुले दाखल होतात. त्यांना केवळ शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. पण पुस्तके आणि शाळेचे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती केल्याने मुलांच्या पालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवते. अनेक पालक कर्ज काढून, वस्तू गहाण ठेवून, उधार उसनवारीवर पैसे घेऊन हे साहित्य खरेदी करतात. अथवा यातील काही गरीब मुले शाळाच सोडून देतात.
शाळांना अशाप्रकारची सक्ती करता येऊ शकत नाही. पुस्तके कुठून घ्यावीत, हा पालकांचा प्रश्न आहे. शाळेने अशी सक्ती केल्यास पालकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. आम्ही अशा शाळांवर जरूर कारवाई करू. — माधवी तांडेल, वसई तालुका गट शिक्षण अधिकारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compulsion to purchase school supplies certain vendors arbitrary management schools amy
First published on: 19-05-2022 at 00:07 IST