scorecardresearch

भाईंदर येथील उद्यानाची दुरवस्था

भाईंदर पूर्वेला साईबाबा नगर येथे पालिकेकडून उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

‘यशवंतराव चव्हाण उद्याना’तील पाळणे, खेळणी मोडकळीस

भाईंदर : भाईंदर पूर्वेला साईबाबा नगर येथे पालिकेकडून उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील पाळणे, खेळणी व शोभेच्या वस्तू मोडकळीस आल्याने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ उद्याने बांधण्यात आली होती. त्यामध्ये लहान मुलांकरता खेळणीही बसवली होती. या उद्यानांची नियमित देखभाल करण्यासाठी उद्यान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूकही केली आहे. आता मात्र या उद्यानांची दुर्दशा झाली असल्याचे दृश्य दिसत आहे.

भाईंदर पूर्वेकडील साईबाबा नगर परिसरातील यशवंतराव चव्हाण उद्यानात बसवलेली खेळणी, पाळणे मोडकळीस आले आहेत. लाखोंचा खर्च करून तयार केलेले पाण्याचे फवारेही बंद पडले आहेत. सध्या जरी करोना प्रतिबंध नियमांमुळे उद्याने पूर्ण क्षमतेने सुरू नसली तरी गेले अनेक दिवस हीच परिस्थिती  आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही अवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे संध्याकाळी उद्यानांत मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याची भीतीही स्थानिकांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे प्रशासन उद्यान सुशोभीकरणासाठी कोटय़ावधींचा खर्च करत असताना उद्यानांची मात्र दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या निविदा केवळ ठेकेदारच्या आर्थिक सोयीकरिता काढल्या जात असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परमार यांनी केला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Condition garden equipments municipality ysh