वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे वर्सोवा पूल ते बापाणेपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या आठवडाभरापासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत. वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था आहे. विविध ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
महामार्गालगत झालेला माती भराव, अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. मध्यंतरी साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरते मार्ग तयार केले होते. याशिवाय विविध ठिकाणी खडी व बारीक भुकटी मिश्रित साहित्य टाकून खड्डेही भरले होते. मात्र याचा काहीच फायदा झालेला नाही. सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू आहे. घराबाहेर पडल्यानंतर महामार्गावर पोहचताच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वर्सोवा पुलापासून ते मालजीपाडा, बापाणे फाटय़ापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेग कमी होत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
खड्डे बुजविल्याचा दावा फोल
उसळलेल्या जनक्षोभानंतर महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. मास्टिक, डांबरी कोल्ड मिक्सच्या साहाय्याने खड्डे बुजविले गेले. वर्सोवा पूल, ससूपाडा, ससूनवघर, मालजीपाडा उड्डाणपूल, जूचंद्र उड्डाणपूल, मालजीपाडा रेल्वे पुलाखाली, डहाणू महालक्ष्मी मंदिर यासह इतर ठिकाणी ८५ ते ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र सद्य:स्थितीत महामार्गाची अवस्था पाहता हा दावा फोल ठरला आहे.
पोलिसांकडून दुरुस्ती
महामार्गावर खड्डय़ांमुळे वाहतूककोंडी निर्माण होत आहे. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेले खड्डे आता वाहतूक पोलिसांनी स्वत:च बुजविण्यास सुरुवात केली आहे. तर ज्या भागात उंच-सखल रस्ता होता तिथे जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण केले जात आहे, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.