वसई: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आणि वाढती महागाई याविरोधात आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसचे नालासोपाऱ्यात अनोखे मेलोडी आंदोलन पुकारले. यावेळी आजी आणि माजी जिल्हाध्यक्षांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेटचे हार घालत तसेच जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध नोंदवला.
इंधनटंचाई, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ, जीवनावश्यक गोष्टींचे वाढलेले दर यामुळे देशात महागाईचा भडका उडाल्याचा आरोप करत काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीकडूनही आज नालासोपारा पश्चिमेतील मंथन हॉटेलसमोरील पेट्रोल पंपावर धरणे आंदोलन पुकारण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेटचे हार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा निषेध नोंदवला. तसेच मेलोडी चॉकलेट वाटतानाची त्यांची चित्रफीत भारताची प्रतिमा मलिन करणारी असून त्यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तसेच इंधनाच्या दरवाढीबाबत संताप व्यक्त करताना, समाजमाध्यमांवर लोकांची दिशाभूल करणाऱ्या चित्रफिती प्रसारित होत आहेत. ज्यात मोदी भक्त पाचशे आणि हजार रुपयाला सुद्धा पेट्रोल डिझेल घ्यायला तयार आहेत, तर सन्माननीय पंतप्रधान यांनी विशेष नियम तयार करून पेट्रोल पंपावर पाचशे रुपये लिटरची एक रांग आणि २०१४ सालच्या ६५ रुपये लिटरची एक रांग, आशा दोन रांगा सुरू कराव्या. बघूया जनता कोणत्या रांगेत जास्त पेट्रोल भरते आणि अंधभक्त कोणत्या रांगेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांनी केली. तर राहुल गांधी यांनी प्रचंड महागाईचा आगडोम उठणार अशी दिलेली चेतावणी आज खरी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते ओनील आल्मेडा यांनी दिली.
आंदोलनाच्या अखेरीस वसई प्रांताधिकारी शेखर घाडगे यांना पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करणारे निवेदन देत, जनतेवर लादलेली पेट्रोल डिझेल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, काँग्रेस नेते ओनील आल्मेडा, काँग्रेसच्या गटनेत्या सॅरल डाबरे, हितेश थोरात, किरण शिंदे, रतन तिवारी, रासपाचे नेते नितीन पेंढारी,आनंदा बावस्कर सर, भीमराव पेटकर, रितेश सोलंकी, संदीप कनोजिया, तबारक खान, संजय मीना,सोहेल चौधरी, सोहेल खान, राजू भाई, रफिक शेख,साबीर शेख,अशोक शर्मा, रामदास वाघमारे, साजिद सय्यद यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
