वसई: स्मार्ट मीटर विरोधात वसई विरार शहरातील वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फे वसई पूर्वेतील महावितरण कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी यावेळी स्मार्ट मीटर, अवाजवी वीज देयके, वीज वाहिन्या आणि रोहित्रांमध्ये वारंवार होणारे बिघाड, औद्योगिक वसाहतींतील विजेचा खेळखंडोबा अशा विविध समस्यांबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली.

गेल्या काही महिन्यांपासून सतत खंडित होणारी वीज, वीज देयकांमध्ये अचानक झालेली वाढ आणि स्मार्ट मीटर बसविण्याचा शासनाचा नियम यामुळे वसई विरारमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. जुलै महिन्यात याच समस्यांविरोधात शहराच्या विविध भागात नागरिकांनी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयांवर आंदोलन पुकारले होते.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील मंगळवारी महावितरण कार्यालयावर नागरिकांच्या वीज समस्यांना संबंधी आंदोलन पुकारले. यावेळी जुने वीजमीटर खराब झाल्यानंतर त्याच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचं काम महावितरण आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय अनेक ठिकणी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत.

स्मार्ट मीटरला विरोध करणार्‍या काही ग्राहकांशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी अरेरावी करत असल्याची उदाहरणेही पुढे येऊ लागली आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त वीज देयके येत असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांनी केली.

तर अनेक ठेकेदार कामात दिरंगाई करत असताना व दर्जाहिन काम करत असताना तक्रारी करूनही महावितरणकडून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही, कामण, पोमण, चिंचोटी, वसई फाटा, पेल्हार व पूर्व पट्टीतील लघुउद्योजकांसाठी कोणत्याही सुविधा न देता महावितरणकडून जबरदस्तीने वसुली केली जात असल्याचा आरोपही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. तर चर्चेअंती वीज देयक अवाजवी वाटत असल्यास त्याची खातरजमा करून त्यात दुरुस्ती केली जाईल. याव्यतिरिक्त ग्राहकांच्या अन्य तक्रारींचेही त्वरेने निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी दिले.