वसई: “एखादा झेंडा हातात धरून जात, प्रांत, धर्म किंवा भाषेच्या नावाखाली राष्ट्रहित आणि राष्ट्रद्रोहाच्या सोयीस्कर व्याख्या पसरवल्या जात असलेल्या आजच्या काळात, देशाचा सर्वोच्च कायदा असणारे संविधान सामान्य नागरिकांना माहिती असणे हेच सर्वात मोठे राष्ट्रकर्तव्य आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे यांनी केले.

वसईतील पापडी येथील कृपामाता सभागृहात शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी आयोजित ४५व्या सुवार्ता साहित्य मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिशप थॉमस डिसोजा होते. तर व्यासपीठावर सुवार्ता मासिकाचे संपादक फा. जोएल डिकुना, ॲड. परमानंद ओझा, ॲड. साधना धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘संविधान आणि सद्यःस्थिती’ या विषयावर बोलताना ॲड. जायभावे यांनी उपस्थितांना अत्यंत सोप्या शब्दांत संविधानाचे महत्त्व उलगडून सांगितले. “संविधान खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर त्याचा आत्मा (स्पिरिट) समजणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्था सशक्त ठेवण्यासाठी राज्यकर्ते आणि माध्यमांना प्रश्न विचारणारे सुजाण नागरिक हवेत,” असे ते म्हणाले. तसेच तरुणांनी मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून प्रत्यक्ष मुक्त संवादात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्याच्या पहिल्या सत्रात ‘पर्यावरण: जबाबदारी कोणाची?’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यात ध्यास फाउंडेशनच्या संस्थापिका कीर्ती शेंडे, विस्परिंग ग्रीन फाउंडेशनच्या संस्थापिका जेनिफर डिसिल्वा आणि पर्यावरण कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे सहभागी झाले होते. लॉना वाझ यांनी या सत्राचे संयोजन केले.

यावेळी बोलताना मॅकेन्झी डाबरे यांनी वसईत बुजवली जाणारी बावखळे, पाणथळ जागा व डोंगरांवरील अतिक्रमणे तसेच वाढीव चटईक्षेत्रामुळे हरवत चाललेल्या वसईच्या ओळखीवर चिंता व्यक्त केली. तर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य करत, स्वतः निर्माण केलेल्या कचऱ्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःच घेतली पाहिजे, असे कीर्ती शेंडे व जेनिफर डिसिल्वा यांनी स्पष्ट केले.

सुवार्ता मासिकासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या आणि सामाजिक योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये सुवार्ता मासिकासाठी सहकार्य करणारे नाझरेथ अथाईत, बेंजामीन केदारकर, झेवियर डिसोजा, झेवियर डिमेलो, रेमंड मच्याडो आणि सँड्रा अथाईत यांचा समावेश होता. तर सामाजिक योगदानाबद्दल सिंथिया बाप्टिस्टा, विल्यम अथाईत, अँथनी हिलरी परेरा, फिलिप दादोडा आणि लखू गुरुजी यांना सन्मानित करण्यात आले.