scorecardresearch

नायगाव उड्डाणपुलाच्या कामाला गती

नायगाव पूर्व- पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हे वेगाने सुरू झाले आहे. 

वसई: नायगाव पूर्व- पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हे वेगाने सुरू झाले आहे.  पुलावरील रेल्वेच्या जागेतील स्टील गर्डर लाँचिंगचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करून पुलाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काँक्रिटीकरण, डांबरीकरण व इतर आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

नायगाव वसईचा परिसर महामार्गाला जोडण्यासाठी नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत मागील काही वर्षांपासून सुरू आहे. विविध प्रकारच्या अडचणींमुळे हे काम धिम्या गतीने सुरू होते.  करोनाचे संकट कमी होताच पुन्हा एकदा हे काम पूर्ण करण्याच्या कामाला गती दिली आहे.  दोन्ही बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र रेल्वेच्या भागातील काम पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉकची आवश्यकता होती. याच अनुषंगाने रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून मेगाब्लॉक घेऊन आरसीसीचे खांब उभे करण्यात आले होते. त्यानंतर उड्डाणपुलाचा पूर्व पश्चिम भाग १० स्टील गर्डरद्वारे जोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी २७ व २८ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेऊन पहिले पाच तसेच ११ व १२ फेब्रुवारी रोजी उर्वरित पाच अशा चार टप्प्यांमध्ये एकूण १० स्टील गर्डर बसवून पुलाला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे अधिकारी, ठेकेदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे भागातील गर्डर बसविण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण  झाले आहे.यापुढे आता रेल्वेच्या भागातील गर्डरला ब्रेकिंग लावण्याचे काम  बाकी राहिले आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक मिळताच तेही काम पूर्ण केले जाईल असे मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाचे उपअभियंता भगवान चव्हाण यांनी सांगितले आहे. याशिवाय  भागातील आता काँक्रिटीकरण , डांबरीकरण व इतर आवश्यक कामे बाकी आहेत. तेही काम लवकरच पूर्ण करून येत्या एप्रिल ते मे महिन्यादरम्यान पूल खुला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उड्डाणपुलामुळे नायगाव पूर्व पश्चिम भाग जोडले जाणार असून नायगाव – वसई विरार – राष्ट्रीय महामार्ग यामधील अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची मोठय़ा प्रमाणावर बचत होणार आहे.

एकीकडे सुटका तर दुसरीकडे कोंडी ?

नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र रेल्वे फाटकावर सातत्याने फाटक पडत असल्याने मोठय़ा वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.जर हा पूल खुला झाला तर या भागात वाहनांची वर्दळ अधिक वाढणार आहे.  याशिवाय या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाचे कामही आताच सुरू झाले आहे. ते काम पूर्ण होण्यास अजूनही काही कालावधी लागणार आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता नायगाव पूर्व पश्चिम खुला करण्यास घाई करू नये अशी मागणी रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली आहे. जर असे झाले तर कोंडीची समस्या अधिक जटिल होऊ शकते. सध्याचे सुरू असलेले चित्र पाहता एकीकडे सुटका तर दुसरीकडे कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction flyover work east west naigaon ysh

ताज्या बातम्या