मात्र पुरेशा दळणवळणाच्या सोयी सुविधांअभावी मुंबईला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधन खर्च होते. भाईंदर खाडीवर पूल २२ वर्षांपासून रखडलेला आहे. यासंदर्भात वसईच्या आमदारांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या बैठकीला नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे राजेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि अतिरिक्त सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
भाईंदर आणि नायगाव दरम्यान मेट्रो रेल्वेच्या बाजूला अतिरिक्त खाडी पूल आणि वर्सोवा-विरार-पालघर सागरी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली. या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण गुजरात यांच्यात पूल जोडण्यास तसेच दळणवळण सोयीचे होण्यास मदत होणार आहे, असे आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शहरात ७ नवीन रस्ते प्रकल्प आणि १२ नवीन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. त्यांची कामे देखील लवकर मार्गी लावण्याची मागणी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएमबी आणि महारेल या प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित संस्थांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी १२ उड्डाणपूल
वसई, विरार शहरातील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रखडलेल्या १२ उड्डाणपुलांचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत. मनोर-वाडा-आसनगाव या भागांना मुंबई-नाशिक समृद्धी महामार्गाला जोडणे, रेल्वे उड्डाणपूल, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.