वसई: नालासोपारा मधील बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी मंगळवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी चौहान यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत श्याम शिंदे आणि राजेश महाजन पोलीस अधिकार्यांचा छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. या दोघांच्या अटकेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जयप्रकाश चौहान हे नालासोपारा मधील बांधकाम व्यावायिक होते. मंगळवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यामध्ये पोलिस कर्मचारी श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांना जबाबदार धरले आहे. या दोघांनी चौहान यांना ५० लाखांचे कर्ज दिले होते. त्या कर्जाच्या परतफेडीसाठी दोघे चौहान यांचा मानसिक छळ करत होते. आचोळे पोलिसांनी श्याम शिंदे, राजेश महाजन तसेच एजंट लाला लजपत या तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या तिघांना बुधवारी दुपारी वसई सत्र न्यायालयात हजर केले.
दोन्ही पोलीस सेवेतून निलंबित
बुधवारी दुपारी श्याम शिंदे, राजेश महाजन आणि लाला लजपत यांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिंदे आणि महाजन या दोन्ही पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली.
काय होते प्रकरण?
नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी श्याम शिंदे याने ५० लाख रूपये दिले होते. एका वर्षात दुप्पट रक्कम मिळणार होती. जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता. मात्र इमारत बांधकामास एक वर्षाहून अधिक वेळ झाल्याने पोलिस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला होता. जयप्रकाश यांनी २२ लाख ॲानलाईन आणि १० लाख रोख रक्कम असे मिळून ३२ लाख दिले होते. तरी ते तिघे उर्वरित रक्मेसाठी त्रास देत होते. ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला.
दोन्ही पोलिसांची वादग्रस्त कारकिर्द
श्याम शिंदे आणि राजेश महाजन या दोन पोलिसांची कारकिर्द पहिल्यापासून वादग्रस्त राहिली आहे. गेली अनेक वर्ष ते वसई विरार मधील पोलीस ठाण्यातच तळ ठोकून आहेत. श्याम शिंदे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेत तर राजेश महाजन आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. विरार मधील विवांता हॉटेल मध्ये त्यांची भागीदारी असल्याची चर्चा आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी या दोघांची बदली केली होती. तरी ते परत आले होते.