इंधन बचतीसह प्रदूषणावरही नियंत्रण

वसई-विरार शहराच्या रस्त्यांवर लवकरच विद्युत बस धावणार आहेत.

वसई-विरार पालिकेची तीन विद्युत आणि १५ सीएनजी बस खरेदी

वसई:  वसई-विरार शहराच्या रस्त्यांवर लवकरच विद्युत बस धावणार आहेत. पालिकेने तीन विद्युत बस आणि १५ सीएनजीवर चालणाऱ्या बस विकत घेण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.

वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे. तसेच वाढणारे शहरीकरण, विविध कंपन्या यामुळे वायू प्रदूषणात मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना पालिका हद्दीत राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) या योजनेअंतर्गत  महानगरपालिकेने प्रस्ताव सादर  केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्यातून केवळ सहा महानगरपालिकांना वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी मंजूर केला होता. त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याच्या एक भाग म्हणून विद्युत बस आणल्या जाणार आहेत.

शहरातील प्रदूषण हे वाहनांमधून निघणाऱ्या धूरामुळे मोठय़ा प्रमाणावर होत असते. यासाठी पालिकेने प्रायोगिक तत्वावर तीन विद्युत बस आणि १५  सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकर या बस शहरातील रस्त्यावर धावणार आहेत. या बसची किंमत १० कोटी ८५ लाख एवढी आहे. सीएनजी बसमध्ये इंधन भरण्यासाठी तीन ठिकाणी सीएनजी पंप उभारले जाणार आहेत. विद्युत बसचा प्रयोग मुंबई आणि पिपंरी-चिंचवड शहरात यशस्वी झालेला आहे. त्यानंतर विद्युत बस असणारी वसई-विरार महापालिका ही तिसरी महापालिका ठरणार आहे, अशी माहिती परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी दिली.

या विद्युत बस या वातानुकूलीत असणार आहेत. त्यात बॅटरी असून ती चार्ज करण्यासाठी बस आगारात ‘चार्रिग पॉईंट’ची व्यवस्था केली जाणार आहे. या विद्युत बसेस मुळे त्याच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही. या बसना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर शहरात आणखी बस आणल्या जातील असेही पाटील यांनी सांगितले. पालिकेची परिवहन सेवा खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येते. सध्या पालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात ६५ बस असून त्या १८ मार्गांवर धावत आहेत.

विविध उपाययोजना

केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार वसई-विरार महापालिकेचा समावेश ‘मिलियन प्लस सिटी’ या योजनेमध्ये करण्यात आला आहे. हवा गुणवत्तेसाठी या योजनेअंतर्गत महापालिकेला केंद्राकडून ३२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. शहरात चार ठिकाणी मियावाकी पद्धतीने उद्यान साकारले जाणार आहे. याशिवाय शहराच्या चार प्रमुख मध्यवर्ती ठिकाणी कारंजे उभारणे, १६  ठिकाणी हवेचे प्रदूषण नियंत्रण करणारे विंड ऑग्मेंटेशन प्युरिफाईंग युनिट उभारणे, तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र बसवणे, वाहनतळ उभारणे आदींचा समावेश आहे. स्मशानातील प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्मशानभूनीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यापैकी पाचूबंदर येथे एक विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे.

शहरातील बसमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यादृष्टीने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.या विद्युत बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रितेश पाटील, सभापती, परिवहन समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Controlling pollution along with fuel saving cng bus ssh

ताज्या बातम्या