scorecardresearch

वसई, विरार शहरातही करोनाचा पुन्हा शिरकाव; रुग्णसंख्येत अचानक वाढ, पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष सुरू

वसई, विरार शहरात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिकाने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

Corona
करोना (प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई : Vasai-Virar Corona Outbreak वसई, विरार शहरात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिकाने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. डिसेंबरपासून शून्य रुग्ण संख्या असताना अचानक मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात रुग्ण आढळून येऊ लागले आहे. मागील सहा दिवसांत ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी शहरात एकाच दिवसात १० रुग्ण आढळले आहेत.

  ८ डिसेंबर २०२२ पासून शहरात करोना रुग्णसंख्या शून्य होती. १० फेब्रुवारी रोजी रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. मात्र त्यांची संख्या एक आकडी होती. दिवसाला केवळ एक ते दोन रुग्ण असायचे. मात्र मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात रुग्ण संख्या वाढू लागली. बुधवारी शहरात एकाच दिवसात १० रुग्ण आढळले. 

 नागिरकांनी करोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले. रुग्ण वाढत असले तरी ते सौम्य लक्षणे असलेली आहेत.  रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे, असे चौधरी यांनी सांगितले.  करोनाचे रुग्ण असले तरी सध्या एकही ‘एच३ एन२’ चा रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काळजी काय घ्यावी?

सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास, अंगदुखी, घशामध्ये खवखव, धाप लागणे, तीव्र खोकला असल्यासा करोना चाचणी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या वाढत्या करोनारुग्णांमुळे प्रत्येकाने मुखपट्टी (मास्क) वापरावा असे पालिकेने सांगितले आहे. नागरिकांनी घाबरू नये मात्र करोना नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावे असेही पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बैठक घेऊन करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.  रुग्ण वाढल्यास पुरेसा औषध साठा तयार ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या विरार येथील चंदनसार येथील रुग्णालयात करोनाचा एक विभाग सुरू करण्यात आला आहे. इतर बंद करोना केंद्रे  गरज पडल्यास पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या