नोव्हेंबर महिन्यात सव्वादोन लाख नागरिकांचे लसीकरण

भाईंदर : करोना आजाराचा धोका टाळण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून लसीकरण मोहिमेवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात पालिकेतर्फे १ लाख २१ हजार ६७० जणांना लशी देण्यात आल्या.  आतापर्यंत लशीची पहिली मात्रा ७९ टक्के जणांना तर दुसरी मात्रा ५८ टक्के जणांना दिली आहे.

मीरा-भाईंदर शहराला राज्य शासनाकडून नियमित लशींचा पुरवठा होत असल्याने पालिकेची लस मोहीम   विनाअडथळा सुरू आहे. शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण हे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असून विविध मोहिमा राबवून लशी दिल्या जात आहे. नोव्हेंबर महिन्यात पालिकेने शहरात दररोज ३७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू ठेवून एकूण १ हजार ११० लशींचे सत्र ठेवले होते. त्यात १ लाख २१ हजार ६७० जणांना लशी देण्यात आल्या. नोव्हेंबरअखेपर्यंत पालिकेने लशीची पहिली मात्रा २२ हजार ४९४ जणांना दिली आहे, तर दुसरी मात्रा ९९ हजार १७६ जणांना दिली आहे. शहरातील पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ७९ टक्के तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ५८ टक्के एवढे असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरणप्रमुख डॉ. अंजली पाटील यांनी दिली.

नोव्हेंबर महिन्यात ४ जणांचा मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर बराच कमी झाला असून नोव्हेंबर महिन्यात शहरात ३५४ नवीन करोना रुग्ण आढळून आले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. याशिवाय ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा धोका असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेकडून लसीकरण केंद्रावर तसेच खाजगी गृह संकूलात शिबीर आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी लस घ्यावी.

डॉ. अंजली पाटील, लसीकरणप्रमुख