खासगी लसीकरणाचा आधार

वसई विरार शहरात पालिकेची लसीकरण केंद्र ही सातत्याने बंदच असतात.

पालिकेची लसीकरण केंद्र ही सांतत्याने बंद

वसई: वसई विरार शहरात पालिकेची लसीकरण केंद्र ही सातत्याने बंदच असतात. त्यामुळे करोना प्रतिबंध लस घेण्यासाठी नागरिकांनी आता खाजगी लसीकरण केंद्रांची वाट धरली आहे.

वसई विरार महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत ५१ केंद्रावर मोफत लसीकरण करण्याचा उपक्रम सुरू आहे. मात्र शासनाकडून अपुरा लसीचा साठा उपलब्ध होत आहे.यामुळे पालिकेच्या क्षेत्रातील  बहुतांश शासकीय लसीकरण केंद्र ही बंद ठेवण्यात येत आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. काही नागरिक लशीच्या दुसऱ्या मात्रेच्या तर काही पहिली मात्रा मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तर काही नागरिकांनी लस मिळविण्यासाठी आपला मोर्चा थेट खाजगी लसीकरण केंद्रावर वळविला आहे. याच अनुषंगाने वसई विरार शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, खाजगी रुग्णालये यांच्या पुढाकाराने सशुल्क लसीकरण शिबिरे आयोजित केली जाऊ लागली आहेत.  नुकताच मागील आठवडय़ात वसई विरार शहरात विविध ठिकाणी सशुल्क लसीकरण शिबिरे भरविण्यात आली होती. यात  काही ठिकाणी ५०० तर काही ठिकाणी ७०० ते ७८० रुपये घेऊन कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आला होता.  बहुजन विकास आघाडीच्या युवा विकास मंडळाने नानावटी मॅक्स हॉस्पीटलच्या सहकार्याने मागील आठवडय़ात १२ ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजित करून त्यात २० हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे.  शहरात विवीध ठीकाणी मोहीमा राबवण्यात येणार असल्याची माहिती युवा विकास आघाडीचे आशिष वर्तक यांनी सांगितले आहे.

लसीकरणात पालिकेची उदासीनता

मागील काही दिवसांपासून पालिकेचे लसीकरण सुनियोजित पणे होत असल्याने नागरिकांना त्याचा भरुदड सहन करावा लागत आहे. आधीच करोनाने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.अशात नागरिकांना पालिकेकडून देण्यात येणारी मोफत लस ही वेळेत उपलब्ध होत नसल्याने आता सर्वसामान्य नागरिकांनाही खाजगी लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करवून घ्यावे लागत आहे. एकीकडे खाजगी लसीकरण केंद्रावर लस साठा मिळतो मात्र पालिकेच्या केंद्रावर लस साठा मिळत नाही. अशी स्थिती असल्याने पालिकेचा या लसीकरणाच्या बाबतीत उदासीनता असल्याची टीका आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus corona vaccine private vaccination vasai virar ssh

ताज्या बातम्या