आठवडय़ाची मुलाखत : पालिका शाळेची गुणवत्ता वाढवणार

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा विक्रम केला आहे.

अजित मुठे, उपायुक्त, मीरा भाईंदर महानगरपालिका

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्याकडे आरोग्य खाते आल्यानंतर वेगवेगळ्या अभिनव कल्पना राबवून त्यांनी स्वच्छ भारत अभियानात सफाई चॅलेंज वर्गवारीत शहराला दुसरा क्रमांक मिळवून दिला. त्यांच्याशी ‘लोकसत्ता’ने केलेली बातचीत..

*  स्वच्छ भारत अभियानात मीरा-भाईंदर शहराला एवढे मोठे यश कसे मिळवून दिले? शहराला सुंदर ठेवण्यासाठी काय काय उपक्रम सुरू केले?

पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले. सफाई मित्रांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले. हाताने सफाईची सर्व कामे बंद करून यांत्रिकीकारणावर भर दिला. यामुळे मीरा-भाईंदर महापालिका सफाई मित्र चॅलेंज स्पर्धेत देशात नववी आणि राज्यात दुसरी आली आहे. अर्थात पालिका आयुक्त दिलीप ढोले यांचे मार्गदर्शन होतेच.

*  अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे तुम्ही कर्दनकाळ ठरला आणि सर्वाधिक कारवाईचा विक्रम केला. कशा प्रकारे कारवाई केली?

मी कर्दनकाळ नाही, फक्त नियमानुसार कामे केली. मला ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. त्यात मी सुमारे २ हजार बांधकामे तोडली. महिन्याला १५० ते १७० बांधकामे मी जमीनदोस्त केली. त्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली. अगदी डान्स बारपासून हॉटेल आणि इमारती तोडल्या.

*   या कारवाई करताना काय अडचणी आल्या?

विरोध तर स्वाभाविक होता, पण मी कुठल्याही दबावाला बळी पडलो नाही आणि भविष्यातही बळी पडणार नाही.

*    कचरा करणाऱ्यांना कशा प्रकारे दंड आकारला?

शहर स्वच्छ ठेवणे याला प्राथमिकता आहे. त्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी केली. कुणी कचरा टाकताना, थुंकताना दिसला की त्याचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले. अशा लोकांच्या घरी जाऊन कारवाई करतोय. कचरा कुठे आढळला आणि नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली तर २४ तासात तो कचरा उचलला जाईल, याची दक्षता घेतली. लोकसहभागातून शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य दिले. स्वच्छ दिवाळी हा अनोखा उपक्रम राबवला. यामुळे शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यास मदत होत आहे.

*  शिक्षण खाते तुमच्याकडे आहे, त्यामध्ये काय बदल करणार आहात का?

पालिका शाळेतील विद्यर्थ्यांची संख्या घटत आहे. ती रोखण्यासाठी भर देणार आहे. सातारा जिल्ह्य़ातील कराड शाळेचा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. म्हणजे पालिका शाळांची गुणवत्ता वाढवणार आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देणार आहोत. कराडच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आदल्या रात्रीपासून रांगा लागतात. तसा दर्जा शहरातील पालिका शाळांना मिळवून देणार आहोत. किमान १० पालिका शाळा डिजिटल करणार आहोत.

*  प्लास्टिकच्या वापरावर कशी कारवाई सुरू केली आहे?

कारवाई यापूर्वी सुरू केली आहे. मागील ३ महिन्यांत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून १३ लाखांचा दंड आकारला आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर ५ हजारांचा दंड आकारला जात आहे. ज्या भागात प्लास्टिक पिशव्या आढळतील त्या भागातील स्वच्छता निरीक्षकाला जबाबदार धरून निलंबित केले जाणार आहे. अधिकाधिक कापडी पिशव्यांच्या वापर व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

मुलाखत : सुहास बिऱ्हाडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corporation increase quality school ysh

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या