लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मुंबई आमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलावरून एका दाम्पत्याने उडी मारल्याची घटना घडली आहे. यात पतीला वाचवण्यात यश आले आहे. मात्र महिला खाडीत बुडाल्याने अग्निशमन विभागामार्फत बचाव कार्य राबविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

शशिकला यादव (२८)असे खाडीत बुडालेल्या महिलेचे नाव आहे. ती नायगावची रहिवासी आहे. तीन दिवसापूर्वीच उत्तर प्रदेश राज्यातून पती दिनेश यादवकडे आली होती. गुरुवारी सकाळी पती पत्नी मध्ये वाद झाल्यानंतर ती वर्सोवा पुलावर आत्महत्या करण्यासाठी गेली. यावेळी तिची समजूत काढण्यासाठी तिची मावशी देखील तिच्या मागे गेली. दरम्यान, पतीला येत असल्याचे पाहून शशिकलाने पुलावरून खाडीत उडी मारली. ते पाहून पती दिनेशने देखील उडी मारली.

आणखी वाचा-Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

स्थानिकांनी दोरखंडाच्या मदतीने पतीला वाचवले. मात्र शशिकला पाण्यात वाहून गेली. अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा शोध सुरू आहे. यादव दाम्पत्याला ३ महिन्यांचे तान्हे बाळ असून ३ वर्षांचा मुलगा आहे.