कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढू लागले आहे. चालू वर्षांतच अवघ्या पाच महिन्यांत ३८४ गुन्हे रेल्वेमध्ये घडले आहेत.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत मीरारोड ते वैतरणा अशा ७ रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. यातच मीरा- भाईंदर व वसई विरार शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे या अंतर्गत असलेल्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी हे प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे याच गर्दीचा गैरफायदा घेऊन विविध प्रकारचे गुन्हेही घडत आहेत. यात पाकीटमारी, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी, बॅग चोरी, छेडछाडीचे प्रकार अशा घटना घडू लागल्या आहेत.

अशा या चोरीच्या व इतर घटनांच्या तक्रारी या पोलीस ठाण्यात येत असतात. करोनाकाळात वर्दळ कमी होती. त्यावेळी गुन्ह्यांचे प्रमाण हे कमी झाले होते. मात्र निर्बंध शिथिल झाल्याने मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकातील वर्दळ वाढली आहे. त्यापाठोपाठ आता गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागले आहे. सन २०२२ मध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये ३८४ इतके गुन्हे वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. यात मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी यांसह गुन्ह्यांचा यात समावेश आहे. या घडलेल्या गुन्ह्यांपैकी आतापर्यंत ११४ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात ५५८ गुन्हे घडले होते. आता तर केवळ पाच महिन्यांतच ३८४ इतके गुन्हे घडले आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अडचणी

वसई पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. कारण वसई रेल्वे स्थानकासह नालासोपारा, विरार, भाईंदर, मीरारोड अशा महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या स्थानकांचा समावेश आहे. अशा ठिकाणी गस्त ठेवण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. सध्या स्थितीत वसई रेल्वे पोलीस ठाण्यात १६२ मंजूर पदापैकी १०६ इतकेच मनुष्यबळ आहे. त्यातही कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी १५ ते २० कर्मचारी हे कार्यालयीन कामकाज पाहतात. अजूनही मंजूर पदापैकी ५६ पदे ही रिक्त असल्याने अडचणींना सामोरे जावे लागते.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

करोना नियमांच्या शिथिलीकरणानंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. अनेकदा प्रवासी हे बेजबाबदार राहतात, तर प्रवासी प्रवासात झोपतात अशा स्थितीचा गैरफायदा घेत या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना सतर्क राहणे गरजेचे आहे असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

रेल्वेमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण हे वाढले आहे. या घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. याशिवाय अशा घटना घडू नयेत यासाठीसुद्धा रेल्वे पोलिसांच्या पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. – सचिन इंगवले, पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस ठाणे वसई.