भाईंदर: मुंबईच्या वेशीवर असलेल्या मांडवी पाडा परिसरात मागील काही महिन्यांपासून मुक्त संचार करणाऱ्या सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीला अखेर वन विभागाने यशस्वी बचाव मोहिमेद्वारे पकडून पिंजऱ्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दहिसर पथकर नाक्यापासून काही अंतरावर, मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगत मांडवी पाडा परिसर आहे. या भागात खाजगी जमिनींवर पूर्वी दगड खाणींचे उत्खनन करण्यात आले होते. सध्या या खदानींमध्ये साचलेल्या पाण्याचा साठा करून त्याची विक्री केली जाते.याच खदानींपैकी एका पाणवठ्यात मागील काही दिवसांपासून मगरीचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक बाब म्हणजे ही मगर केवळ पाण्यातच मर्यादित न राहता परिसरात फेरफटका मारताना दिसत होती. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिक सचिन जांभळे यांनी याबाबत वन विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. वन विभागासह रेस्क्यू टीम आणि संबंधित संस्थांच्या मदतीने अनेक दिवस मगरीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

या मोहिमेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्यात पिंजरा बसवण्यात आला होता. तसेच कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी परिसरात कॅमेरेही बसवण्यात आले होते. संपूर्ण बचावकार्य गोपनीय ठेवण्यात आले.अखेर मंगळवारी सायंकाळी मगरीला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर बुधवारी वन विभागाने मगरीची वैद्यकीय तपासणी करून तिला मुंबईतील नैसर्गिक अधिवासात सोडून दिल्याची माहिती दिली आहे.