विरार : वसई विरारमध्ये किरकोळ बाजारात कांदा, लसूणाचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाल्याने सुखावलेल्या सामान्य नागरिकांना अवघ्या आठवडाभरात दुपटीने टोमॅटोची दरवाढ झाल्याने चांगलाच दणका बसला आहे. शहरातील किरकोळ बाजारपेठ मध्ये ६० ते ८० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे टोमॅटोची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली असल्याने आणि इंधन, वाहतुकीवरील खर्च व वाढती मजुरी ही दरवाढीची कारणे सांगितली जात आहेत.
मागील आठवडय़ात केवळ ३० ते ४० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो या आठवडय़ात दुपटीने वाढ होत ६० ते ८० रुपये किलो दराने विकले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाशी येथील कृषी बाजार समिती येथील घाऊक बाजारातील दर २० रुपयांवरून ५० रुपयांवर गेले असल्याने किरकोळ बाजाराला उधाण आले. वसई विरारमध्येसुद्धा काही प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले जाते. त्याचबरोबर नाशिक, पालघर येथूनसुद्धा टोमॅटो बाजारात येतात. पण त्यांचीसुद्धा आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे विरारमधील लक्ष्मी भाजी भांडार येथील तुकाराम भेकरे यांनी सांगितले.
मागील महिन्यापासून सर्वच भाज्यांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे. त्यात सातत्याने होणारी इंधनदर वाढ, वाढता वाहतुकीवरील खर्च आणि वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे पिकांवर परिणाम होत आहे. यामुळे उत्पादनातसुद्धा घट पाहायला मिळाली आहे. एकूणच पोषक वातावरण नसल्याने टोमॅटोचे भाव वाढत चालले आहेत. येत्या काही दिवसांत सारखीच परिस्थिती राहिली तर टोमॅटोचा दर १०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाज्यांच्याही किमतीत वाढ
टोमॅटोचा वापर रोजच्या जेवणात केला जातो. मात्र टोमॅटोच्या दर वाढीने सामन्यांच्या चिंता वाढविल्या आहेत. टोमॅटोबरोबर इतर भाज्या फरसबी, वाटाणे यांच्या किमती १०० च्या जवळपास आहेत. तर इतरही भाज्या ६० ते ७० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकत आहेत. यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस ढासळत चालले आहे.