पालिकेकडून दंडात्मक कारवाई होणार

वसई : वसई-विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे, वाहनातून कचरा टाकणे, मलमूत्र विसर्जन करणे असे प्रकार करीत असल्याने शहर अस्वच्छ बनू लागले आहे. अशा प्रकारे शहर अस्वच्छ करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे.

रस्त्यावर कचरा टाकण्याबरोबरच वेगवेगळय़ा पद्धतीने अस्वच्छता पसरविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून रस्ते, फुटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवली जात आहे. काही नागरिक तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून रस्त्यावर थुंकण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. त्यामुळे रस्ते व इतर ठिकाणे तर खराब होतातच शिवाय इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असतो तर काही जण रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, मलमूत्र विसर्जन करणे असे प्रकारही घडतात.

अशा प्रकारे अस्वच्छता पसरवून शहर विद्रूप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आता दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

यात सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मुखपट्टी न लावणे यासाठी शंभर रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे यासाठी दोनशे रुपये अशा प्रकारे दंड आकारला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.