वसई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. यंदा वसईत दसऱ्यानिमित्ताने सुमारे दोन हजार नवीन वाहनांची नोंद परिवहन विभागात करण्यात आली आहे. यातून पावणेआठ कोटींचा महसूल परिवहन विभागाला प्राप्त झाला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा त्यातील एक महत्त्वाचा मुहूर्त. यानिमित्ताने विविध नवीन वस्तू आणि वाहने खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो. करोनाकाळातील दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा वाहनखरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांनी काही दिवस आधीपासूनच वाहन विक्रीच्या दुकानात चौकशी सुरू केली होती. आगाऊ नोंदणीही केली होती.

वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये १ हजार ८९५ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात मालवाहतूक करणारी ३५ वाहने, ४४५ चारचाकी वाहने, ६८ ऑटोरिक्षा, १ हजार ३४७ दुचाकी वाहने आदींचा समावेश आहे. या नोंदणीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ७ कोटी ७५ लाख २४ हजार ४८६ रुपये इतका महसूल मिळाला आहे. साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या महसुलात ७० ते ७५ लाखांची वाढ झाली आहे.

वाहनांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ
वाहनांच्या किमतीही वाढल्या आहेत. यंदा वाहनांच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र वाहन खरेदीसाठीचा यंदाचा प्रतिसाद गेल्या वर्षीपेक्षा चांगला आहे, असे वाहन विक्रेत्यांनी सांगितले आहे.