Dadar Ratnagiri Passenger Express Restart Update: गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून दादर-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली जात आहे. तर खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर आता कोकणातील सर्वच गाड्या वसईमार्गे धावणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, खासदार वायकरांनी त्यांच्या एक्स खात्यातून दिलेल्या माहितीनुसार वसईनंतर आता एक्सप्रेसच्या जुन्या मार्गाची देखील आता पुन्हा एकदा पाहणी केली जाणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई अशा विविध ठिकाणी मोठ्या संख्येने कोकणातील लोक वास्तव्यास आहेत. तर दादर, सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा विविध रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या या गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीयांसाठी जलद प्रवासाचे साधन ठरत आल्या आहेत. त्यातलीच एक ट्रेन म्हणजे दादर- रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस.
करोना महामारीच्या आधी ही लोकल दादर ते रत्नागिरी या मार्गावरून चालवली जात होती. मात्र, करोना काळात दादर-रत्नागिरी ही गाडी बंद करून ती ‘दिवा टर्मिनल’ येथून सुरू करण्यात आली होती. यामुळे मुंबईच्या मध्य आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ही लांब पल्ल्याची गाडी पुन्हा सुरू करावी अशी, मागणी राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन सादर केले होते. तर या भेटीनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे दादर किंवा सीएसएमटी मार्गावरून दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले होते. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर वसई – जुचंद्र दरम्यान नवीन रेल्वे मार्ग पुढील दीड ते दोन वर्षांत पूर्ण होईल. हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर, त्या मार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या थेट पश्चिम रेल्वेमार्गे वसईपर्यंत आणि तेथून पनवेलमार्गे कोकणापर्यंत प्रवास करतील, अशी माहितीही खासदार वायकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
दादर ते रत्नागिरी मार्गाची केली जाणार पाहणी
तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ७ एप्रिल रोजी शिवसेना (शिंदे गट) रवींद्र खासदार वायकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, दादरहून दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सुरू करण्याच्या कार्यवाहीतील व्यवहार्यतेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील. त्यामुळे आता जुन्या मार्गावरून कोकण रेल्वे धावते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
