वसई: कोरोनाकाळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. मात्र, खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा विस्तार दादरपर्यंत करण्याऐवजी ती थेट वसईमार्गे चालवली जाणार आहे. तर भविष्यात सर्वच कोकण रेल्वेंचा मार्ग बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात दादर-रत्नागिरी गाडी बंद करण्यात आली होती. ही गाडी आता फक्त दिवा स्थानकापर्यंत चालवली जाते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानक गाठावे लागत होते. पण,मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा सोयीचे नसल्यामुळे दिवा – रत्नागिरी गाडीचा विस्तार दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत करण्यात यावा अशी मागणी केली जात होती.
तसेच यावरून राजकीय वाद देखील निर्माण झाला होता. मनसे पक्षाने याविरोधात आवाज उठवल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की रेल्वे मंत्र्यांना रत्नागिरी-दादर किंवा सीएसटीएम अशा गाड्या सुरु करण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अशी सेवा सुरु करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.
तसेच भविष्यात कोकणात जाणाऱ्या गाड्या आता थेट पश्चिम रेल्वे मार्गावरून वसई-जूचंद्रमार्गे कोकणात जाणार असल्याची माहितीही खासदार वायकर यांनी दिली.पुढे ते म्हणाले की, मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, विटी या रेल्वे स्थानकातील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी जोगेश्वरी जंक्शनचे काम केले जात आहे. तर जून महिन्यापासून जोगेश्वरी जंक्शन सुरू केले जाईल.
तसेच येत्या एक ते दोन वर्षात नायगाव ते जुचंद्र दरम्यान नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे भविष्यात कोकण रेल्वेसह २४ प्रकारच्या रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतील. तसेच प्रवाशांना नवीन मार्ग मिळणार आहे, त्यामुळे यात राजकारण आणू नये. नवीन मार्ग तयार करण्यासाठी एक ते दोन वर्षांचा वेळ लागणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
असा असेल नवा प्रवास…
रेल्वेच्या या नव्या नियोजनानुसार, कोकणात जाणाऱ्या गाड्या आता पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी जंक्शनवरून सुटून बोरिवलीमार्गे जुचंद्र, कामण रोड, खारबाव, डुंगे, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोली या मार्गाने पनवेलला पोहोचतील आणि तिथून पुढे या गाड्या कोकणाच्या दिशेने धावतील.
