भाईंदर : मुंबई-गोवा मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकावर चढ-उतार करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. फलाट आणि रेल्वे डब्याच्या पायऱ्यांमध्ये मोठी दरी राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास धोकादायक ठरत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कोकणात जाण्यासाठी मांडवी एक्स्प्रेस ही महत्त्वाची रेल्वे मानली जाते. वर्षभर या गाडीला मोठी गर्दी असते. गोव्याहून मुंबईकडे येणारी ही गाडी रात्री दादर स्थानकावर पोहोचते. दादर येथे मोठ्या संख्येने प्रवासी उतरतात. मात्र गाडी फलाट क्रमांक १० वर थांबल्यानंतर फलाट आणि डब्याच्या पायऱ्यांमध्ये तब्बल दीड ते दोन फूट अंतर राहत असल्याने प्रवाशांना उडी मारून चढावे किंवा उतरावे लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी इतरांच्या मदतीशिवाय चढ-उतार करणे कठीण जात आहे. हातात सामान असल्यास अडचण आणखी वाढते. पावसाळ्यात फलाट ओला व निसरडा होत असल्याने पाय घसरून अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. मात्र अशा प्रकारे फलाट आणि डब्यात मोठी दरी राहिल्यास सुरक्षित प्रवासाच्या दाव्यालाच तडा जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन दादर स्थानकावरील संबंधित फलाटावर आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, तसेच प्रवाशांच्या सुरक्षित चढ-उतारासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.