भाईंदर :-डहाणूच्या प्रसिद्ध आई महालक्ष्मी मंदिरात भिंतीवर लिहिण्यात आलेले गुजराती भाषेतील सूचना फलक मराठी एकीकरण समितीच्या मागणीनंतर हटवण्यात आले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डहाणू येथे महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.

तसेच हे ठिकाण गुजरात राज्याच्या जवळ असल्यामुळे अनेक गुजराती भाषिक भाविक देखील मंदिरात येत असतात. त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन सुरळीत व्हावे, यासाठी मंदिर देवस्थानकडून जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच काही भिंतींवरही या सूचना लिहिण्यात आल्या आहेत.दरम्यान, अशाच एका भिंतीवर मराठीसोबत गुजराती भाषेतही सूचना मंदिर विश्वस्तांकडून लिहिण्यात आल्या होत्या.

मात्र मंदिर हे महाराष्ट्रात असल्यामुळे येथे सूचना मराठीतच असाव्यात, अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर विश्वस्त समितीकडे केली होती. त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने या मागणीनुसार गुजराती भाषेतील सूचना हटवल्याचा दावा समितीकडून करण्यात आला आहे.याबाबतची माहिती समितीकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. मात्र मंदिर विश्वस्तांकडून अद्याप यास दुजोरा देण्यात आलेला नाही.