डहाणू पोलीस क्रिकेट सट्टेबाजांच्या शोधात

सध्या क्रिकेट सामने सुरू असताना त्यावर मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे. डहाणूचे तरुण तसेच विद्यार्थी वर्ग या जुगारामागे ओढला जात असल्याने क्रिकेट सट्टा हा चिंतेचा विषय बनला आहे.

सीमा भागातील जुगार क्लबचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी

डहाणू : डहाणू तालुक्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन तरुणांना क्रिकेट सट्ट्याचे वेड लावणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजांच्या शोधात डहाणू पोलिसांनी ससेमिरा लावला असून त्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पालघर पोलिसांनी सूत्रे हाती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पोलिसांना चकवण्यासाठी सट्टेबाज दररोज आपल्या जागा बदलून दिशाभूल करत सट्टा खेळत आहेत. संशय येऊ  नये म्हणून 

भाईंदर, मीरा रोड, दमण, उमरगांव यांसारखी शहरातील ठिकाणे बदलत आहेत. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली असून क्रिकेट सट्टेबाजांना सबळ पुराव्यासह पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे असे समजते. याबाबत तलासरी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल दिली.

सध्या क्रिकेट सामने सुरू असताना त्यावर मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे. डहाणूचे तरुण तसेच विद्यार्थी वर्ग या जुगारामागे ओढला जात असल्याने क्रिकेट सट्टा हा चिंतेचा विषय बनला आहे. मात्र पोलिसांच्या भीतीने कोणीही तक्रार देण्यासाठी जात नसल्याची माहिती त्रस्त पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. क्रिकेट सट्टा घेऊन गेल्या पाच वर्षांत या बुकींनी कोट्यवधींची माया जमा केली आहे. सुरुवातीला इस्त्री करणारे, साडी विकणारे हे बुकी आज कोट्यधीश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, घोलवड हद्दीमध्ये कुठलेही गैरप्रकार होत नाहीत असा दावा घोलवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी केला.

गिरगाव, आच्छाड, वाणगाव, डहाणू, कासा येथे क्लब तेजीत

डहाणू तालुक्यात तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गिरगाव येथे वाडीमध्ये क्लब खेळवला जातो. लाखोंची उलाढाल होत असलेल्या या क्लबसाठी ठाणे, मुंबई, गुजरात, दमण, दादरा येथून जुगारी येतात. व्यापारी, कंपनी मालक, कारखानदारांना बसवले जाते. करोना महासाथ सुरू असतानाही हा क्लब सुरू होता असे स्थानिकांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत रिसॉर्ट येथे क्लब चालवला जात आहे. आच्छाड, वाणगाव, डहाणू, चिंचणी या ठिकाणचे क्लब डहाणू शहरातून नियंत्रित केले जात असल्याचे सांगितले. रात्रीच्या सुमारास सुरू होणाऱ्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तरुणांची सागर नाका, मसोली, इराणी रोड येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. तासा दोन तासांत मोठी रक्कम लावून लखपती होण्याचे आमिष दाखवणाऱ्या सट्टेबाजांना फायदा होत असून जुगार खेळणाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.  पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी अवैध व्यवसायांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dahanu police in search of cricket bookies cricket betting craze among college youth akp

Next Story
१३१ दिवसांत दीड लाख लसीकरण
ताज्या बातम्या