वसई: गुलाबी थंडीत डहाणूच्या लालचटक स्ट्रॅबेरीमुळे वसईच्या बाजारपेठा बहरल्या आहेत. परवडणारी किंमत, आंबट गोड चव आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरींच्या तुलनेत असणारा ताजेपणा यामुळे डहाणूच्या स्ट्रॉबेरीला वसईच्या ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाला संपला की रोजगाराच्या शोधात शहरी भागाकडे स्थलांतर करावे लागे. पण, डहाणू आणि तलासरी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी केलेल्या स्ट्रॉबेरी लागवडीच्या यशस्वी प्रयोगामुळे जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले आहे. महाबळेश्वरच्या तुलनेत डहाणूची स्ट्रॉबेरी आकाराने काहीशी लहान असली तरी चवीला गोड असल्यामुळे ती ग्राहकांना भुरळ घालत आहे.
डहाणू गाव हे वसई शहरापासून जवळच असल्यामुळे अवघ्या काही तासांतच स्ट्रॉबेरी बाजारात पोहोचते आणि तिचा ताजेपणा पण टिकून राहतो. दुसरीकडे महाबळेश्वरवरून येणारी स्ट्रॉबेरी वाहतूक खर्च, आणि प्लास्टिक पॅकिंगमुळे महाग असते. तर त्यामानाने किरकोळ विक्रेते तसेच थेट शेतकऱ्यांकडून विकली जाणारी स्ट्रॉबेरी अगदी किफायतशीर दरात ग्राहकांना विकत घेता येते.
महाबळेश्वरहून विक्रीसाठी आणली जाणारी स्ट्रॉबेरी अनेकदा दबलेली आणि शिळी असते. त्यामानाने डहाणूच्या बाजारातून विक्रीसाठी ठेवण्यात आलेली स्ट्रॉबेरी तुलनेने ताजी, रसाळ आणि चविष्ट असल्यामुळे लहान मुलेही अगदी आवडीने खातात, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
दररोज सकाळी आम्ही सगळे गावातले विक्रेते पाहिली लोकल पकडून डहाणूच्या बाजारात जातो. तिथे बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी आलेले शेतकरी किंवा लहान दुसऱ्या लहान विक्रेत्यांकडून स्ट्रॉबेरी विकत घेतो. स्ट्रॉबेरीचा एक मोठा वाटा आम्हाला जवळपास १२०० रुपयांना पडतो. मग वसईच्या बाजारात त्याचे लहान-लहान वाटे करून आम्ही विकतो. स्ट्रॉबेरी ताजी आणि पालघर जिल्ह्यातली असल्यामुळे लोक कौतुकाने विकत घेतात, अशी प्रतिक्रिया वसईतील फळ विक्रेत्या महिलांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराला हातभार
गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील शेतकरी उत्पन्नासाठी पारंपरिक शेती पिकांवर अवलंबून आहेत. पण, प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे असणारा कल वाढवला आहे. वसई, विरार, ठाणे आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठा अगदी काही तासांच्या अंतरावर असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. यामुळे ग्रामीण रोजगाराला चांगला हातभार लागत आहे.

