वसई: साहसी खेळाचा दर्जा असणारा दहीहंडी उत्सव वसई विरार शहरात यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शहरातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पथके हंडी फोडण्यासाठी वसई विरारमध्ये येतात. मात्र, दहीहंडी उत्सव भरवल्या जाणत्या ठिकाणांना जोडणारे रस्ते आणि मुख्य मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गोविंदांना या खड्डेमय मार्गातूनच प्रवास करावा लागणार आहे.

वसई विरार शहरातील नागरिकांसाठी रस्त्यावर पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणारी गैरसोय काही नवीन नाही. मुसळधार पाऊस अन्मुi निकृष्ट दर्जाची रस्ते दुरुस्ती यामुळे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर आणि खासकरून पूर्व पट्ट्यातील महामार्ग व औद्योगिक वसाहतींना लागून असणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

यामुळे नागरिकांना दैनंदिन तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तसेच नादुरुस्त रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे प्रवाशांना मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार अशा विविध शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर तरी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. तसेच गेल्या महिन्यात दहीहंडी उत्सवाच्या चर्चेसाठी पार पडलेल्या बैठकीदरम्यान महापौरांनी देखील दहीहंडीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले होते.

मात्र, त्यानंतरही नालासोपाऱ्यातील आचोळे रोड, नालासोपारा पूर्व व पश्चिम परिसर जोडणारा रस्ता, वसईतील माणिकपूर व सातिवली, तुंगारफाटा, नायगाव जूचंद्र तसेच विरार रेल्वे स्थानकाला जोडणारे रस्ते आणि महामार्गाला जोडणारे रस्त्यांवर अजूनही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वसईत राजकीय पक्ष, आजी व माजी आमदार, नगरसेवक तसेच खाजगी संस्थांकडून आकर्षक बक्षिसे असणारे दहीहंडी उत्सव आयोजित केले जातात. मुंबई, ठाणे तसेच नजिकच्या इतर शहरातील बरीच गोविंदा पथके या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात.

मात्र, दहीहंडीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण न झाल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही गोविंदांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता दहीहंडी उत्सव भरवल्या जाणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या २६ रस्त्यांची यादी तयार करून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यापैकी २५ रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच प्रभागनुसार विचार केल्यास प्रभाग आय, प्रभाग बी, प्रभाग सी, प्रभाग डी, प्रभाग ई, प्रभाग जी व प्रभाग एचमधील खड्डे बुजवण्याचे काम ७० ते ८० पूर्ण झाले आहे. तर डांबराच्या अनुपलब्धतेमुळे प्रभाग ए, प्रभाग सी, व प्रभाग एफमधील काम काहीसे संथ गतीने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.