वसई: गोपाळकाळा अर्थात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी वसई विरार शहर सज्ज झाले आहे. विविध ठिकाणी लाखो रुपये रक्कमेच्या दहीहंड्या आयोजित केल्या आहेत. तर दुसरीकडे गावपातळीवर ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे तयार झाली आहेत. शहरात ८२५ ठिकाणी खासगी व सार्वजनिक दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाही वसई विरार शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यंदा गोपाळकाला शनिवारी आला असून रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने नागरिकांसह गोविंदांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरातील प्रमुख चौक, नाके आणि वर्दळीच्या ठिकाणी आकर्षक सजावट, लखलखती विद्युत रोषणाई आणि डीजेच्या तालावर हंड्या उभारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. लाखमोलाच्या बक्षिसांमुळे स्थानिक गोविंदा पथकांसोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागातील नामवंत पथके वसई-विरारमध्ये दाखल होणार आहेत.

राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शहरात बहुजन विकास आघाडी, भाजपा, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा राजकीय पक्षांतर्फे लाखो रुपये पारितोषिके असलेल्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या आहे. शहरात १४५ सार्वजनिक व ६७९ खाजगी अशा आठशेहून अधिक ठिकाणी हंड्या बांधल्या जाणार आहेत.

दहीहंडीच्या ठिकाणी लावणी नृत्य, कलाविष्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडणार आहेत. यासाठी सिनेकलाकार, नृत्य कलाकार ही दाखल होणार आहेत.

आरोग्य विभाग ही सज्ज

एका वर एक मनोरे रचताना अनेकदा गोविंदा जखमी होतात. या जखमी गोविंदांना उपचार मिळावे वसई विरार महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग ही सज्ज झाला आहे. महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत खाजगी रुग्णालयांनी सुद्धा जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.

पोलिसांचा बंदोबस्त शनिवारी साजऱ्या होणारा दहीहंडी उत्सवासाठी वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. दही हंडी उत्सवा दरम्यान होणारे वादविवाद , महिलांच्या छेडछाडीच्या घटना, महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी फेकणाऱ्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्याासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याशिवाय ध्वनी प्रदूषण संदर्भात जे नियम आहेत त्याचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.