भाईंदर :- दहिसर- भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान क्रेन कोसळून अपघात घडला आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.
रघुनाथ दास (३८) आणि काना सिंग (४५) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दहिसर ते भाईंदर लिंक रोडचे काम करण्यासाठी एल एन्ड टी संस्थेने उभारलेल्या प्रकल्प स्थळी काम करत होते. दरम्यान शनिवारी साडेबारा च्या सुमारा संस्थेने उभारलेल्या क्रेन वर काम करत असताना ती अचानक कोसळली. त्यामुळे यात गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. घटना स्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
तर या संदर्भात तपास करून गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे. तर भाईंदर पश्चिम येथे सुरू असलेल्या या कामादरम्यान ही पहिली दुर्घटना समोर आल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षे बाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत.
