भाईंदर: दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ मधील दहिसर ते काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा या आठवड्यापासून सुरू केला जाणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीरपणे दिली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मिरा भाईंदर शहराला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडून दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ चे काम साधारण सात वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. यात दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मागील काही महिन्यांपासून मेट्रोची चाचणी सुरू आहे.
दरम्यान, ही चाचणी सुरू असताना १ ते ३ जानेवारीदरम्यान सीएमआरएसच्या पथकाने प्रकल्पाची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान काही किरकोळ सुधारणा करण्याच्या सूचना एमएमआरडीएला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची पूर्तता करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे ही मेट्रो नेमकी कधी धावणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, शुक्रवारी मिरा भाईंदरच्या विविध कामांनिमित्त आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी महापालिकेमार्फत आयोजित रौप्य महोत्सव पदार्पण कार्यक्रमावेळी दिली. या भेटीत मुख्यमंत्री स्वतः मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या आठवड्यापासून दहिसर ते काशिगाव दरम्यानची मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा दावा मेहता यांनी जाहीर भाषणात केला आहे.
मिरा भाईंदर परिसरातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना सध्या रेल्वेतील प्रचंड गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दहिसर टोलनाक्यावर रोज मोठी कोंडी होते. मेट्रो सुरू झाल्यानंतर काशिगाव, पांडुरंगवाडी, मिरा गाव आदी स्थानकांवरून थेट अंधेरी गाठणे शक्य होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
