भाईंदर :- अखेर दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका सुरू होणार असल्यामुळे संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निमित्ताने शहरात सर्वत्र लोकप्रतिनिधी मिठाई वाटप करून हा आनंद साजरा करत आहेत. तसेच जागोजागी मेट्रोची चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.

सलग दोन वेळा लोकार्पणाची तारीख ठरवून रद्द झालेल्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या लोकार्पणाचा अखेर दिवस आज उजाडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मार्गिकेला हिरवा कंदील दाखवण्यासाठी येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील प्रवाशांमध्ये आता आनंदाचे वातावरण पसरले आहे.मुंबईला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गिकेवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांना आता मेट्रोसारखा सोपा आणि आरामदायक प्रवास उपलब्ध होणार असल्यामुळे चाकरमानी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंद आहे.

त्यामुळे मेट्रोच्या सेवेबाबत शहरात सर्वत्र चर्चा रंगत आहे. दरम्यान, मेट्रोचे श्रेय घेण्यावरून मागील काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपमध्ये देखील वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मतदारांना आपणच मेट्रो आणली हे दाखवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता हे विविध दावे करत आहेत.आपला दावा अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जाहिराती करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्याने निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांनी उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच जागोजागी मिठाई वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे लोकप्रतिनिधी शहरातील उद्याने, चौक आणि दुकानदारांना भेट देत मिठाई वाटप करत असल्यामुळे एकंदरीत संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.