भाईंदर :- दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका येत्या ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवासी या मेट्रोने प्रवास करण्यास आतुर झाले आहेत. हा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यात प्रामुख्याने मेट्रो मार्गिकेवर कोणीही जाऊ नये, यासाठी ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत.

दहिसर मिरा भाईंदर मेट्रो ९ मधील दहिसर ते काशीगाव दरम्यान उभारण्यात आलेला पहिला टप्पा येत्या ३ एप्रिल रोजी सुरू केला जाणार आहे. या मेट्रोचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या तयारीचे काम एमएमआरडीए प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, हा प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी स्थानकांवर सरकते जिने, उदवाहिका, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन अलार्म आणि रुग्णवाहिका मार्ग अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मात्र, नव्या मेट्रो स्थानकांवर मार्गिकेवर जाण्यापासून रोखण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. मुंबईतील अनेक मेट्रो मार्गिकांवर काचेची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. मात्र काशीगाव स्थानकावर अशी भिंत अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी मार्गिकेवर जाऊ नये, यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर मार्गिकेवर जाण्यास सक्त मनाई असून, असे आढळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल किंवा तुरंगवास होईल असे नमूद करण्यात आले आहे.