भाईंदर :- दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ बुधवारपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे पहिल्याच दिवशी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या बहुतांश प्रवाशांनी या मार्गिकेचा वापर केल्याने मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्ग रहदारीच्या वेळी पूर्वीच्या तुलनेत अधिक मोकळा दिसत होता.मिरा भाईंदरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी शासनाने मेट्रो मार्गिकेचा विस्तार करून दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ उभारली आहे.
या मार्गिकेतील दहिसर ते काशिगाव दरम्यानची सेवा बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. या मार्गिकेमुळे काशिगाव ते अंधेरी असा थेट प्रवास करण्यासाठी महामार्गासोबतच मेट्रोची नवी वाहतूक सेवा नागरिकांना उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पहिल्याच दिवशी मुंबईत काम करणाऱ्या चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणात या मेट्रोचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
परिणामी सकाळी तसेच सायंकाळच्या रहदारीच्या वेळेत मुंबईच्या महामार्गांवर वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे जाणवले. इतकेच नव्हे, तर वारंवार कोंडी आणि इतर कारणांमुळे ठप्प होणारा हा प्रवास काल मात्र सुरळीत आणि धावता दिसून आला. यामुळे मेट्रोने तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना आनंददायी अनुभव मिळाला.
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील २० ते ३० टक्के ताण कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. पहिल्याच दिवशी त्याची अनुभूती आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, हे चित्र भविष्यातही कायम राहावे, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.
मात्र सिग्नलमुळे त्रास
मुंबईच्या मार्गांवरील प्रवास धावता झाला असला, तरी दहिसर सीमेवरील पांडुरंग वाडी येथे असलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे यात व्यत्यय निर्माण होत आहे. आवश्यकता नसतानाही येथील मोठ्या सिग्नलवर वाहने थांबत असल्यामुळे रांगा लागत आहेत.त्यामुळे या सिग्नलमुळे होणारा त्रास कमी करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
