भाईंदर :- दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मार्गिकेतील पांडुरंग वाडी मेट्रो स्थानकाचे नाव ‘पेणकर पाडा’करण्याची मागणी करत स्थानिकांनी आंदोलन पुकारले आहे. येत्या ६ एप्रिल रोजी दहिसर ते काशिगाव दरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असून, या मार्गिकेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुमित्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी एमएमआरडीए प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मुळात या मेट्रोचे लोकार्पण ३ एप्रिल रोजी होणार होते. मात्र शासन पातळीवरील काही अडचणींमुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उद्घाटनापूर्वीच स्थानकाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटला आहे. दहिसर टोलनाका ओलांडल्यानंतर मीराबाई परिसरानंतर येणाऱ्या पहिल्या स्थानकाला एमएमआरडीएने ‘पांडुरंग वाडी’ असे नाव दिले आहे. मात्र हे स्थानक जवळील प्रसिद्ध ‘पेणकर पाडा’ परिसराशी संबंधित असल्याने, त्या भागाचे नाव स्थानकाला देण्यात यावे, अशी स्थानिकांची सातत्याने मागणी होती. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर ३ एप्रिल रोजी दुपारी काही स्थानिक तरुणांनी पांडुरंग वाडी मेट्रो स्थानकावर आंदोलन केले. त्यांनी स्थानकावरील नामफलकावर कागद चिकटवून ‘पेणकर पाडा’ असे नामकरण केले. तसेच शासनाने अधिकृतपणे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

उद्घाटनापूर्वीच उभ्या राहिलेल्या या वादामुळे दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवासासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.