भाईंदर :-दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या उभारणीच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. दीपक हॉस्पिटल परिसरातील परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी मेट्रो स्थानकाखाली प्रस्तावित जिने व एस्कलेटर उभारण्यास स्थानिक दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. परिणामी या स्थानकाच्या कामाला विलंब होत असून संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडीची समस्या कमी करून शहराला थेट मुंबईशी जोडण्यासाठी शासनाने एमएमआरडीएमार्फत दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे महामार्ग आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मेट्रो प्रवासाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून दहिसर ते काशिगावदरम्यानचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर काशिगाव ते सुभाषचंद्र बोस पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रो मार्गिका व स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहे.

मात्र, हे काम प्रगतीपथावर असतानाच दीपक हॉस्पिटल येथील पूर्वीच्या मेडतिया नगर आणि सध्या परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी मेट्रो स्थानकाच्या परिसरात प्रवेशासाठी जिने व एस्कलेटर उभारण्यास स्थानिक दुकानदारांनी विरोध केला आहे. त्यामुळे स्थानकाच्या उभारणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला असून प्रकल्पाच्या पुढील टप्प्यालाही विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी नागरिकांना मेट्रो सेवेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.दरम्यान, ही समस्या मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून आवश्यक जागा ताब्यात देण्याची मागणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दुकानदारांचे म्हणणे काय?

ओम पूनम एन्क्लेव्हमधील दुकानदारांनी एमएमआरडीएकडे लेखी तक्रार करून मेट्रो स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन एस्कलेटरची जागा बदलण्याची मागणी केली आहे. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, एस्कलेटर आणि त्याची संरचना दुकानांसमोर उभारण्यात आल्यास ग्राहकांचा प्रवेश बाधित होईल, दुकानांची दृश्यता कमी होईल आणि व्यवसायाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे आराखड्याचा पुनर्विचार करून पर्यायी जागेचा विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.

आमदार नरेंद्र मेहताच्या विरोधाची चर्चा

मिरा-भाईंदर शहरातील काशिगाव मेट्रो स्थानकाखाली जिने उभारण्याच्या प्रस्तावाला सुरुवातीला माजी आमदार नरेंद्र मेहता यांनीही विरोध दर्शविला होता. या कामामुळे खासगी जागा बाधित होत असल्याचा दावा करत त्यांनी पालिकेकडे टीडीआरऐवजी अन्य मार्गाने भूसंपादन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते कामही दीर्घकाळ रखडल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर आता ओम पूनम एन्क्लेव्हमधील दुकानदारांनीही जिने व एस्कलेटर उभारणीस विरोध केल्याने या विषयाची शहरात चर्चा सुरू आहे.