भाईंदर :- मागील वर्षभरापासून प्रवासी आतुरतेने वाट पाहत असलेली दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ अखेर प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या मार्गिकेला हिरवा कंदील दाखवला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रोचा मान मिरा-भाईंदरला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, आमदार उपाध्याय तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला फडणवीस यांनी दहिसर मेट्रो स्थानकाला भेट दिली. स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह दहिसर ते काशिगाव असा मेट्रो प्रवास केला.

या प्रसंगी नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गिकेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून दुसरा टप्पा देखील याच वर्षी पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले. देशातील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांमध्ये दिल्ली नंतर महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, येत्या काळात जगातील सर्वाधिक विस्तृत मेट्रो जाळे असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या स्थानी येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या मेट्रोमुळे महामार्गावरील सुमारे २० ते ३० टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

मेट्रो बाबत माहिती :-

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो सेवा दहिसर ते मिरा-भाईंदरपर्यंत विस्तारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यामागील उद्देश म्हणजे महामार्गावरील भार कमी करून प्रवाशांना सुलभ प्रवास उपलब्ध करून देणे हा होता.ऑक्टोबर २०१९ पासून एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे दोन टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या मेट्रो सेवेत प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आला असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

अशी आहे दहिसर-काशिगाव मेट्रो सेवा :-

दहिसर-काशिगाव मेट्रो सेवा थेट मुंबईशी जोडली गेली आहे. त्यामुळे गुंदवली ते काशिगाव या सुमारे १९.७९ किमी लांबीच्या मार्गावर एकत्रित सेवा सुरू झाली आहे. परिणामी अंधेरी (पूर्व) ते काशिगाव असा थेट प्रवास शक्य होणार असून प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.मेट्रोची पहिली गाडी सकाळी सुमारे ५:५० वाजता सुटणार असून शेवटची गाडी रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. गर्दीच्या वेळेत दर ५ ते ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत ८ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावणार आहेत.दररोजच्या फेऱ्यांमध्ये आठवड्याच्या दिवशी सुमारे २७६, शनिवारी २२३ आणि रविवारी २०५ फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.एकूणच, या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे मिरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.

मिरा-भाईंदर ते कुलाबा प्रवास :-

दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ती मेट्रो मार्ग ७ शी जोडण्यात आली आहे. आगामी काळात ही मार्गिका मेट्रो मार्ग ३ शी जोडण्यात येणार असून, मिरा-भाईंदर ते कुलाबा असा थेट प्रवास सुरू होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी यावेळी केला.