भाईंदर :- दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्याच दिवशी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

दहिसर -मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ मधील दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

त्यानुसार बुधवारी मिरा भाईंदरमधील काशिगाव मेट्रो स्थानकावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळच्या कार्यालयीन वेळेत चाकरमान्यांची मोठी वर्दळ असल्याने तिकीट घर आणि मेट्रोच्या प्रवेशद्वारांवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. प्रथमच या मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे अंधेरी, गोरेगाव आणि मालाडच्या दिशेने जाणारे नागरिक आनंदी होते.बहुतांश प्रवाशांनी दुचाकीऐवजी मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. बसच्या तुलनेत मेट्रोने प्रवास जलद होणार असल्यामुळे आता हीच वाहतूक निवडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे एकंदरीत मेट्रोचा मोठा फायदा मिरा-भाईंदर शहराला होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

गुंदवली ते काशिगाव या सुमारे १९.७९ किमी लांबीच्या मार्गावर आता एकत्रित सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव असा थेट प्रवास शक्य झाला आहे. मेट्रोची पहिली गाडी सकाळी सुमारे ५:५० वाजता सुटते, तर शेवटची गाडी रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध असते. गर्दीच्या वेळेत दर ५ ते ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत ८ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावणार आहेत. आठवड्याच्या दिवशी २७६ फेऱ्या, शनिवारी २२३ तर रविवारी २०५ फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.