भाईंदर : दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेला येत्या ३ एप्रिलपासून मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. मात्र या कार्यक्रमात एमएमआरडीएच्या वादग्रस्त पुलाचेही उद्घाटन होणार का, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. पुलाच्या अंतिम कामांना अचानक गती देण्यात आल्याने नागरिकांमध्ये या शक्यतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिरा भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. चार मार्गिकांचा असलेला पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांमध्ये कमी होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला होता. या रचनेवरून एमएमआरडीएवर जोरदार टीका करण्यात आली होती.वाद वाढल्यानंतर प्राधिकरणाने पूल योग्य असून भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत अधिकृत भूमिका आणि पत्रकही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तरीही नागरिकांचे समाधान झाले नाही. परिणामी, वाद निवळण्यासाठी वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, सल्लागाराचा अहवाल येण्यापूर्वीच पुलाच्या रचनेत काही बदल करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. फाटकाकडे उतरताना उभारण्यात आलेला दुभाजक काढून टाकण्यात आला असून त्यामुळे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ३ एप्रिल रोजी दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार उपस्थित राहणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.मेट्रो सुरू होणार असल्याने शहरात आनंदाचे वातावरण असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे.
दुसरीकडे, नेटकऱ्यांकडून या वादग्रस्त पुलाचेही उद्घाटन याच कार्यक्रमात करावे, अशी मागणी होत आहे. विशेषतः दीपक हॉस्पिटल परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे हा पूल तातडीने सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.तथापि, पुलाच्या उद्घाटनाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. काम पूर्ण झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
