भाईंदर :- दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो उद्घाटनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या स्थानिक नागरिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे.
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेमध्ये पांडुरंग वाडी मेट्रो स्थानकाच्या नावावरून वाद उभा राहिला आहे. हे स्थानक पेणकर पाडा परिसराला लागून आहे. त्यामुळे या परिसराला पांडुरंग वाडी नाव देण्याऐवजी ‘पेणकर पाडा’ नाव देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.या संदर्भात ३ एप्रिल रोजी स्थानिकांनी आंदोलन देखील केले होते. यावेळी त्यांनी स्थानक परिसरात जाऊन नामफलकावर ‘पेणकर पाडा’नावाचा कागद लावला होता. तसेच, प्रशासनाने उद्घाटनापूर्वी ही मागणी मान्य न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाच्या दिवशी काळे झेंडे दाखवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले होते.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटनासाठी मिरा भाईंदरमध्ये येणार असल्यामुळे पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी पेणकर पाडा येथील आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक अटक करून ताब्यात घेतले.
याबाबतची माहिती आंदोलनकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना दिली आहे. तसेच, येत्या काळात मेट्रो स्थानकाला ‘पेणकर पाडा’ असे नाव देण्यासाठी पुराव्यानिशी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
