भाईंदर : दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेवरील काशिगाव मेट्रो स्थानकाखाली पाणी गळतीची समस्या समोर आली आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

बुधवारपासून दहिसर ते काशिगाव या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यात आली असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काशिगाव स्थानकाच्या बांधकामातील त्रुटी समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्थानकाखालील बांधकामातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले. हे पाणी नेमके कुठून येत आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी त्यामुळे स्थानक परिसरात पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी, मिरा रोडकडून भाईंदरकडे जाणारी वाहतूक संथ होत आहे.

नव्या मेट्रो स्थानकातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने भविष्यात बांधकामाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.तर अशी पाणी गळती म्हणजे बांधकामतील एकप्रकारे त्रुटी असल्याची टीका नागरिक करत आहेत. दरम्यान,संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन यावर उपाय करण्याची मागणी केली जात आहे.