भाईंदर : दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या अंतिम टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून, या मार्गावर मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षअखेरीस ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी खुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा-भाईंदर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने मेट्रो मार्गिका ९ उभारली आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात दहिसर ते काशिगावदरम्यान प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे ३३ हजार प्रवासी या मार्गिकेचा वापर करत आहेत. सध्या काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून, ते सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यात विद्युत वाहिन्या अंथरणे, स्थानक परिसराचा विकास तसेच अन्य तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत.
दरम्यान, आता मेट्रोच्या चाचणीसही सुरुवात करण्यात आल्याचे समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री काशिगाव ते साईबाबा नगर स्थानकापर्यंत मेट्रो ट्रेनची चाचणी घेण्यात आली. त्यापुढील स्थानकापर्यंतही ही चाचणी टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आवश्यक परवानग्या प्राप्त करून ही मार्गिका वर्षअखेरीस नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस असल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मिरा-भाईंदरमधून मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ वरील भाईंदर पश्चिम येथील शहीद भगतसिंग मेट्रो स्थानकाच्या बांधकामातील महत्त्वाचा तांत्रिक अडथळा अखेर दूर झाला आहे. स्थानक परिसरातून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीवर आवश्यक काम करण्यासाठी शासन आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे भाईंदर पश्चिम येथील स्थानकाचे रखडलेले कामही पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
