scorecardresearch

वसईतील हरित पट्टा नष्ट होण्याचा धोका;वसईत पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संघटना एकत्र

वाढवण बंदर, सागरी नियमन क्षेत्राची घटवलेली मर्यादा आणि चटई क्षेत्रफळ १ केल्याने वसई विरार शहराचा हरित पट्टा पुर्णपणे उध्दवस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वसई: वाढवण बंदर, सागरी नियमन क्षेत्राची घटवलेली मर्यादा आणि चटई क्षेत्रफळ १ केल्याने वसई विरार शहराचा हरित पट्टा पुर्णपणे उध्दवस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वसईत आयोजित पर्यावरणवाद्यंच्या चर्चासत्रात हा धोका व्यक्त करण्यात आला आहे. वातावणरण बदल आणि विनाशकारी प्रकल्प यापासून शहराला वाचविण्यासाठी व्यापक चळवळ उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
वसई विरार शहरात वाढती अनधिकृत बांधकामे, बुजविण्यात आलेले पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत ,निचरा होण्याचे बंद झालेले मार्ग, विकासाच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड, वाढते तापमान, पर्यावरणास घातक असलेले प्रकल्प यामुळे पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी वसईच्या गिरीज येथील विरंगळुला केंद्रात पर्यावरण संवर्धन समिती— वसई, युवा मुंबई व भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ यांच्या तर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात पर्यावरण क्षेत्रात काम करणारे वक्ते व पर्यावरणप्रेमी एकत्र आले होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
पालघर, वसई मध्ये जे प्रकल्प येऊ घातले आहेत त्याचा मोठा परिणाम हा पर्यावरणावर होणार आहे. विशेषत: वाढवण बंदर या प्रकल्पाचा परिणाम वसईवर होण्याची शक्यता असल्याचे शशिकांत सोनवणे यांनी सांगितले. वसईचा हरित पट्टा विविध प्रकारच्या कारणांमुळे कमी होऊ लागला आहे.त्यातच आता हरित पट्टय़ात ०.३३ इतका असलेला चटई क्षेत्र निर्देशांक वाढविण्यात आला आहे. यामुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होणार आहे. वाढविलेला चटई क्षेत्र निर्देशांक रद्द करण्याच्या दृष्टीने लढा सुरू केला असल्याचे पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी सांगितले. याशिवाय पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी भविष्यात तलाव, बावखले, पारंपारिक जलस्त्रोत, वृक्षतोड यांचे संवर्धन करण्यासाठी व्यापक चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे वर्तक यांनी सांगितले.
वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून पूरस्थिती यासह अनेक समस्यांना तोंड द्यवे लागत आहे. शहर नियोजन करताना पर्यावरण पूरक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. यात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र वाचविणे, कचरम्य़ाचे व्यवस्थापन, पावसाचे पाणी मुरण्यासाठीच्या खुल्या जागा, पाण्याचे स्रेत अशा पर्यावरण पूरक उपाययोजना शासनस्तरावरून होणे आवश्यक असल्याचे मत राजू भिसे यांनी व्यक्त केले आहे. शहरात अनेक प्रकल्प राबविले जातात यावेळी केवळ त्या प्रकल्पाची चर्चा होत असते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा पर्यावरणीय दृष्टीने काय परिणाम होतो किंवा त्याचा जीवसृष्टीवर काय परिणाम याची माहिती दिली जात नसल्याचे प्रा भूषण भोईर यांनी सांगितले आहे.
वाढत्या तापमान वाढीचा जीवसृष्टीवर परिणाम
तापमान वाढ, हवामान बदल, परिणाम यावर मार्गदर्शन करताना प्रणाली राऊत यांनी पर्यावरचा होत असलेला ऱ्हास दिवसेंदिवस पृथ्वीवर विविध प्रकारचे बदल घडू लागले आहेत.तर दुसरीकडे तापमान ही प्रचंड प्रमाणात वाढू लागले आहे. या तापमान वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने याचा परिणाम जीवसृष्टीवर होण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापुढे हे तापमान अधिक वाढत जाईल अशा वेळी मानवाला जगणे सुध्दा कठीण होऊन जाईल.
सध्या येऊ घातलेल्या प्रकल्पाचाही पर्यावरणावर परिणाम होऊन उष्णतेच्या लाटा वाढू शकतात. पर्यावरणाचा समतोल राखला जायचा असेल तर येणारे प्रकल्प थांबविणे व सर्वसामान्य नागरिकांनी पुन्हा साधेपणा स्वीकारून वाटचाल केली पाहिजे .यासाठी जनजागृतीसारखी व्यापक चळवळ सुरू करून आतापासूनच पर्यावरण रक्षणासाठी कार्य सुरू केले पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.
मत्स्यसाठय़ावर परिणाम
वसईच्या समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून तेलसाठे शोधण्यासाठी करण्यासाठी सेसमिक सर्वेक्षण केले जात आहे. यासाठीची जी प्रक्रिया वापरली जाते ती अतिशय धोकादायक आहे. या भूगर्भ सर्वेक्षणात खोल समुद्रात स्फोट घडवून आणले जातात. यामुळे मत्स्य जीवांची हानी होते तर जे काही मोठे मासे असतात ते ही आपले क्षेत्र सोडून दूर निघून जातात. याचा विपरीत परिणाम मत्स्यसाठय़ावर होत असल्याचे संजय कोळी यांनी सांगितले.त्यामुळे मागील काही वर्षांपासून जैवविविधता धोक्यात येत असल्याने मच्छिमारांना याचा मोठा फटका बसला असल्याचे कोळी यांनी सांगितले आहे.
जनजागृती
पर्यावरण वाचविण्यासाठी आता सर्व पर्यावरण प्रेमीं एकवटले आहेत. सध्याचा पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता. गावा गावात व प्रत्येक माणसापर्यंत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. आतापासूनच पर्यावरणास हानिकारक असलेले प्रकल्प व इतर पर्यावरण समस्या सोडविण्यासाठी लढा सुरू केला जाणार असल्याचे मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Danger destruction green belt vasai social organizations come together environmental conservation amy

ताज्या बातम्या