scorecardresearch

रस्त्याच्या मध्येच उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका

वसई पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत.

वसई : वसई पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत. नुकतेच रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या बसला धडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. अशा घटना सतत घडत असल्याने रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करणाऱ्या बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

वसई पूर्वेवरून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र काही अवजड वाहने रस्त्याच्या मध्येच उभी केली जाताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मुख्य मार्ग अरुंद होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चिंचोटी पुलाच्या जवळील भागातसुद्धा आत वळणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी अनेक वाहने उभी असल्याचे चित्र दिसून आले आहे. याशिवाय नालासोपारा, पेल्हार, सातिवली अशा ठिकाणी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक मोठय़ा बसेस रस्त्यात उभ्या असतात. मागून भरधाव येणाऱ्या वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघात होण्याची भीती असते. एकीकडे चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड झालेली, बंद पडलेली वाहने, रस्त्यात उभी असतात. ती तातडीने हटवण्यासाठी वेळेवर यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने अनंत अडचणी निर्माण होतात. वाहतूक विभाग मात्र याकडे सरळ दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नुकतेच बावखलजवळ रस्त्याच्या मध्येच उभ्या असलेल्या एका बसला धडकून दुचाकीचा अपघात झाला, त्यात दुचाकीस्वार ठार झाला, तर आणखी दोघे जण जखमी झाले होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या वाहनचालकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Danger of accidents vehicles parked middle road ysh

ताज्या बातम्या