विरार : वसई विरार महानगरपालिकेने पावसाळय़ाआधी २३७ धोकादायक इमारतींवर कारवाई केली आहे. तरीही आणखी ८७ इमारतींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे धोका कमी झाला असला तरी तो टळलेला नाही.
मागील अनेक वर्षांपासून वसई विरार शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न सतावतो आहे. या धोकादायक इमारतींमुळे दरवर्षी अपघात होतात. परंतु पालिका या इमारतींचा डेटाच तयार करत नसल्याने दरवर्षी इमारतींच्या संख्येवरून वाद होत असत. अतिधोकादायक इमारतींवर पालिकेने कारवाई केली की नाही याचीही माहिती मिळत नसे. पण यंदा पालिकेने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत, सर्व प्रभागातील अतिधोकादायक वर्गातील इमारती रिकाम्या करत त्यावर निष्कासनाची कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या नऊ प्रभागात ३२४ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या. मागील वर्षीच्या तुलनेने १५८ अधिक धोकादायक इमारती यंदा सापडल्या. यातील २३७ इमारती पालिकेने निष्कासीत केल्या आहेत. तर अजून ८७ इमारतींवरील कारवाई बाकी आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या माहितीनुसार निष्कासन बाकी असलेल्या ८७ इमारतींना नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. तर ६० इमारतीत रहिवासी राहत आहेत. १४ इमारती रिकाम्या आहेत. तर २३ इमारती तांत्रिक अडचणीत अडकल्याने कारवाई रखडली आहे. २६ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील १५ इमारतींना न्यायालयाकडून स्थगिती मिळाली नाही. त्यामुळेही कारवाई रखडली आहे. परंतु पावसाळय़ापूर्वी कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे.
अनेक धोकादायक इमारतींना नोटीसा बजावत डागडुजी करून राहण्यालायक असलेल्या इमारतींना दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.
आम्ही सर्व धोकादायक इमारतींना नोटिशी दिल्या आहेत. ज्या इमारती अतिधोकादायक वर्गात मोडतात त्या रिकाम्या करून निष्कासित करण्याचे काम सुरू आहे. काही इमारती तांत्रिक अडचणीत असल्याने त्यावर कारवाई थांबवली आहे. पण लवकरच त्याही निष्कासित केल्या जातील. अनिलकुमार पवार, आयुक्त (वसई विरार महानगरपालिका)