scorecardresearch

वसईच्या किनाऱ्यावर अनधिकृत दफनभूमी ; पोलिसांचा प्रकार; पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप

वसईकर नागरिक किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि पोलीस  बेकायदाअसे मृतदेह पुरत आहे.

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसईची ओळख असलेल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह पुरले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे काम कुठल्या गुन्हेगाराकडून नव्हे तर चक्क पोलिसांकडून होत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वसई पश्चिमेला निळाशार समुद्र आणि हिरवी वनराई असल्याने पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भुईगाव, सुरूचीबाग, कळंब, अर्नाळा, रानगाव, राजोडी, नवापूर आदी विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक आणि वसईकर फिरण्यासाठी येथे येत असतात. शासनाकडून हे समुद्रकिनारे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागरूक वसईकर, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करत असतात. किनाऱ्यावरील कचरा गोळा करून किनारे स्वच्छ ठेवत असतात. एकीकडे वसईला राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू असताना या समुद्रकिनाऱ्यावरच पोलिसांकडूनच मृतदेह पुरले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस हत्येचा तपास करत असताना हा प्रकार समोर आला आहे.

वसईकर नागरिक किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि पोलीस  बेकायदाअसे मृतदेह पुरत आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वसई पर्यावरण संवर्धक समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी केली आहे.

तपासात प्रकार उघडकीस

कांदिवली येथून एक दीपक कटूकर नावाचा एक तरुण बेपत्ता झाला होता. त्याची हत्या झाल्याचे नंतर उघड झाले. १२ मे रोजी प्रेमसंबधातून झालेल्या वादातून त्याच्या मित्राने त्याला भाईंदर खाडीत ढकलून त्याला मारले होते. दीपकचा मृतदेह १४ मे रोजी भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर आढळला. वसई पोलिसांना त्याची ओळख पटवता आली नाही. त्यामुळे   मृतदेह बेवारस ठरवला. नियमानुसार तो काही दिवस शवागारात ठेवणे आणि नंतर त्यांची स्मशानभूमीत विल्हेवाट लावणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी  मृतदेह भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर पुरला.    पर्यटकांना त्याची कल्पना नव्हती. कांदिवली पोलिसांनी हत्येचा आरोपी पकडल्यानंतर ही बाब उघड झाली. जेसीबीच्या साहाय्याने  किनाऱ्यावर पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. यापूर्वीदेखील पोलिसांनी एक बेवारस मृतदेह सुरूचीबाग समुद्रकिनाऱ्यावर पुरला होता. 

पोलिसांकडून सारवासारव

याप्रकरणी वसई पोलिसांनी सारवासारव केली आहे. संबंधित तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. डॉक्टरांनी शवविच्छेदनदेखील किनाऱ्यावरच केले. आमच्याकडे शवागार नसल्याने आम्ही तो मृतदेह भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर पुरला, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली. यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी आम्ही खबरदारी घेऊ असेही त्यांनी सांगितले.

नियम काय?

बेवारस मृतदेह असेल तर तो शवागारात महिनाभर ठेवला जातो. त्यानंतर त्याचे दहन अथवा दफन केले जाते. जर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असेल तर मात्र त्याच ठिकाणी शवविच्छेदन केले जाते. परंतु समुद्रकिनाऱ्यावर दफन करण्याचा कुठलाही लिखित नियम नाही. जर अपवादात्मक परिस्थितीत दफन करण्यात आले असेल तर त्या परिसरात सीमांकने करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dead bodies buried on the shores of vasai zws

ताज्या बातम्या