पालिका आणि राज्य शासनात समन्वयाचा अभाव

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी हे कोविड रुग्णालय बंद करून सर्वसामान्य उपचाराकारिता खुले करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहर करोनामुक्त झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर इतक्या लवकर हे रुग्णलाय कोविड बंद करण्यात न यावे अशी मागणी पालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

भाईंदर पश्चिम परिसरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. हे रुग्णलाय पूर्वी महानगरपालिकेच्या ताब्यात होते. मात्र रुग्णालय चालवण्यास पालिका सक्षम होत नसल्यामुळे २०१६ रोजी ते राज्य शासनाकडे हस्तांतरीत केले. मात्र  करोना आजाराचे रुग्ण मिरा भाईंदर शहरात आढळून येत असल्यामुळे दीड वर्षांपूर्वी जोशी रुग्णलय हे कोविड रुग्णालय म्हणून राज्य शासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यात करोना आजाराचा दुसऱ्या लाटेचा गंभीर फटका मिरा भाईंदर शहराला बसला असल्यामुळे याचे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे या रुग्णलायत पालिका प्रशासनाने २०० प्राणवायू खाटा आणि ५० अतिदक्षता विभागात वाढ केली. तसेच  शहरातील प्रमोद महाजन सभागृहात तात्पुरत्या स्वरूपाचे दुसरे कोविड रुग्णालय व उपचार केंद्र उभे केले.

सध्या शहरात २२९ हे रुग्ण करोना बाधित आहेत. यातील साधारण ४० रुग्णांवर या दोन्ही रुग्णालयात पालिका प्रशासनाकडून उपचार करण्यात येत आहेत.मात्र अश्या परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी राज्य शासनकडून महानगरपालिका प्रशासनाला पत्र पाठवून जोशी रुग्णालयातील कोविड उपचार बंद करून ते सामान्य उपचारकरिता खुले करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र करोना आजराच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका डोक्यावर असताना हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी विनंती पालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी रुग्णालय नॉन कोविड केल्याचे पत्र पालिकेला दिले आहे. त्यानुसार  हे रुग्णालय इतर उपचारकरिता खुले करण्यात येणार आहे.मात्र तरी देखील अद्यापही हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे राज्य शासनाकडे केली आहे.

 डॉ. प्रकाश जाधव, मुख्य आरोग्य अधिकारी, पालिका