वसईच्या ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रांत घट

मागील महिनाभरापासून वसईच्या ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

५५ पैकी ४४ गावे करोनामुक्त; ११ गावांत फक्त २३ रुग्ण उपचाराधीन

वसई: मागील महिनाभरापासून वसईच्या ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीणमधील प्रतिबंधित क्षेत्रातही घट होऊ लागली आहे. ग्रामीणमध्ये ५५ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे होती, त्यापैकी ४४ प्रतिबंधित क्षेत्रे ही करोनामुक्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका शहरीभागाप्रमाणे वसईच्या ग्रामीण भागालाही बसला होता. या दुसऱ्या लाटेदरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावात करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यात काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विशेष करून पूर्वेतील भागात अधिक प्रमाणात संसर्गाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. यामुळे येथील गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. यात ग्रामीणमधील ५५ गाव व पाडय़ांचा समावेश होता. यातील आतापर्यंत ४४ गावे ही करोनामुक्त झाली असून त्या ठिकाणी आता एकही करोना रुग्ण नाही, तर दुसरीकडे जी ११ गावे अजून प्रतिबंधित क्षेत्रात आहेत त्या ठिकाणीही केवळ २३ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

या करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई तालुका आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला होता. यात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, प्रतिजन चाचण्या, संशयित रुग्णांचा शोध, करोना उपचार केंद्र, अलगीकरण कक्ष, लक्षणे असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार संच, प्राणवायूची व्यवस्था यासह इतर सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला असल्याची आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील करोनाचा आलेख कमी झाला आहे.

ग्रामीणमध्ये आतापर्यंत ३ हजार ८६८ इतके करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३ हजार ७१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. म्हणजेच ९६.०९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ११० जणांचा बळी गेला असून मृत्युदर हा २.८४ टक्के इतका राहिला आहे. आता ग्रामीणमध्ये केवळ २३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

करोनाबाधित प्रतिबंधित क्षेत्रे

चंद्रपाडा, मालजीपाडा, पोमण, भाताणे, खैरपाडा, खानिवडे, कळंब, सत्पाळा, टेम्भीगाव, अर्नाळा, खोचिवडे अशा ११ ठिकाणी अजूनही २३ रुग्ण उपचाराधीन असल्याने ही ११ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत.

करोनामुक्त झालेली प्रतिबंधित क्षेत्रे

शिवणसई, तिल्हेर, माजिवली, देपिवली, उसगाव, पारोळ, शिरवली, करंजोन, सायवन, भिनार, कळंभोन, मेढे, वडघर, आंबोडा, खार्डी, डोलीव, शिलोत्तर, सारजा, मोरी, टिवरी, नागले, कामण, नवसई, सकवार, टोकरे, हेदवडे, चिमेगाव, भालिवली, आडणे, निर्मळ, सोपारा, कोल्हापूर, पाटीलपाडा, मुक्काम, अर्नाळा किल्ला, आगाशी, रानगाव, देवाले, वासलई, तरखड, अ‍ॅक्टन, पाली, पाणजू, नवघर अशी ४४ प्रतिबंधित क्षेत्रे करोनामुक्त झाली आहेत.

पालघर जिल्हा प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार ग्रामीण भागात आमच्या आरोग्य पथकाने करोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हळूहळू या भागातील करोनारुग्ण संख्या कमी होत आहे.

– डॉ. योजना जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decrease restricted areas rural areas vasai ssh

Next Story
१३१ दिवसांत दीड लाख लसीकरण